कोकणसाठी विशेष पॅकेज द्या : आमदार भास्कर जाधव

चिपळूण : संपूर्ण कोकणात गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे यंदा भातशेतीवर विपरित परिणाम होणार आहे. शासनाने कोकणातील उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार, कृषीमंत्री व मुख्य सचिव यांच्याकडे मागणी केली आहे.

या निवेदनानुसार कोकणात २३ मे पासून पेरणी सुरू होते. जूनच्या पहिल्या आठवड्यात मोसमी पाऊस सुरू होताच भात व नाचणीची रोपे तयार होतात. त्यानंतर पाऊस स्थिरावल्यावर लावणी सुरू होते. परंतु यावर्षी १५ मे पासूनच कमी-अधिक पाऊस सुरू झाला व १९ मे पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत. त्यामुळे पेरणी करायची कशी हा प्रश्न आहे. भात व नाचणी पीक कसे घ्यायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

रायगड जिल्ह्यात रब्बी हंगामात देखील भातपीक घेतले जाते. या ठिकाणी भात कापणीची कामे सुरू असतानाच पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे उभी पिके आडवी होऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेतकरी दुहेरी संकटात आहे. अशा संकटाच्या काळात शासनाने शेतकऱ्यांना धीर देणे आवश्यक आहे. आंबा पिकाचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने कोकणसाठी विशेष पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी आमदार भास्कर जाधव यांनी शासनाकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:53 PM 30/May/2025

Physciobot