चिपळूण : शासन निर्णयाप्रमाणे खासगी रुग्णालयांच्या आवारात उपचार दरपत्रक लावणे आवश्यक आहे; मात्र जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ते लावले जात नाही. त्यातून रुग्णांची लूट होत असते. या विषयीच्या तक्रारीही केल्या आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. जिल्हा आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयांना विविध उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक करावे, अशी मागणी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष भरत लब्धे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांमधून रुग्णांची लूट होत आहे. संबंधित रुग्ण व नातेवाइकांच्या अनेक तक्रारी येतात. अनेकवेळा रुग्णांची परिस्थिती नाजूक असते तेव्हा नातेवाईक खर्चाचा कसलाही विचार न करता जवळच्या रुग्णालयात रुग्णाला दाखल करतात, त्यावेळी नातेवाइकांकडून आगाऊ रक्कम उपचारापोटी भरून घेतली जाते.
अनेकवेळा काही ठिकाणी रुग्णाच्या स्थितीबाबत नातेवाइकांना भीती दाखवली जाते. वस्तुस्थिती समजावून सांगितली जात नाही. रुग्णाला दाखल केल्यानंतर औषधे आणावयास सांगितली जातात, ही औषधेही सर्वच्या सर्व वापरली जातातच असे नाही. त्याविषयी अनेकवेळा शंका उपस्थित केली जाते. आरोग्यक्षेत्रात पारदर्शकता यावी; रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रुग्णालयात विविध उपचाराचे, विविध चाचण्यांचे दर माहिती होणे आवश्यक आहे.
सर्व खासगी रुग्णालयात दर्शनीभागात दरपत्रक लावण्याची सक्ती करण्यात यावी. शासकीय रुग्णालयांत विविध उपचारांच्या दरपत्रकांची नागरिकांना माहिती मिळते; मात्र बहुतांश रुग्णालयांत वैद्यकीय उपचार आणि सेवेचे दरपत्रक लावले जात नाहीत.
कोरोना कालावधीत अधिक दर आकारल्याची चर्चा होती. तेव्हा दरपत्रक लागू करण्याची काहींनी मागणीही केली होती; मात्र आजतागायत बहुतांश ठिकाणी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. शासनाने यापूर्वी खासगी रुग्णालयात दरपत्रक लावण्याचे आदेश दिले आहेत. आरोग्य यंत्रणेने देखील तशा लेखी सूचना खासगी रुग्णालयांना केल्या आहेत; मात्र या आदेशाला हरताळ फासण्याचे काम सुरू आहे, असे लब्धे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
विविध उपचाराचे दरपत्रक खासगी उपचाराचा दर लावणे आवश्यक आहे. शासनाने तसे आदेशही दिले आहेत. त्या आदेशानुसार खासगी रुग्णालयांना लेखी पत्र देण्यात आले आहे. त्याप्रमाणे त्या त्या खासगी रुग्णालयाच्या दर्शनी भागात दरपत्रक लावणे आवश्यक आहे. – डॉ. ज्योती यादव, तालुका आरोग्य अधिकारी, चिपळूण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 12/Oct/2024














