रत्नागिरी : समृद्ध कोकण संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

रत्नागिरी : कोकणातील पर्यटन, मच्छीमार, कृषी क्षेत्रावर शासनाकडून झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी समृद्ध कोकण संघटनेतर्फे साखळी आंदोलन सुरू केले. स्वायत्त कोकण हवे म्हणून जाहीर परिषदेत मागणी करण्यात आली. यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल दुपारपासून बेमुदत उपोषण सुरू केले.

कोकण विकास प्राधिकरण मंजूर आहे. परंतु त्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद नाही. सर्वाधिक उत्पन्न कोकण देते, तर या कोकणासाठी सर्वाधिक निधीही शासनाने येथील विकासासाठी दिला पाहिजे. पण शासनाकडून तो न देण्यासाठी दाखवली जाणारी अनास्था संपावी यासाठी आम्ही हे आंदोलन सुरू करत असल्याचे संघटनेने सांगितले. शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग होत नाही. यासाठी सुरू झालेल्या या आंदोलनाची सुरवात हातखंबा ते साळवी स्टॉप अशी रॅलीने करण्यात आली. त्यानंतर अंबर हॉलमध्ये स्वायत्त कोकण परिषद झाली. या परिषदेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. संपूर्ण कोकणात हे आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनामध्ये आंबा बागायदारांना कर्ज माफी मिळावी या मुख्य मागणीसह पर्यटन वाढण्यासाठी पायाभूत सुविधांचे मजबुतीकरण करावे, कृषी क्षेत्रालाही चांगले दिवस यावेत, यासाठी आंदोलन हाती घेण्यात आले आहे. जोवर याचे अध्यादेश निघत नाहीत तोवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही. त्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो असल्याचे संजय यादवराव यांनी सांगितले. या आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश उर्फ बाबा साळवी, दीपक उपळेकर, संदीप शिरधनकर युयुत्सु आर्ते यांनी केले आहे. तसेच २८ सप्टेंबरला स्वायत्त कोकण यासाठी आदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या आंदोलनात येथील शेतकरी, पर्यटन संघटनानीही सहभाग घेतला आहे.

स्वायत्त कोकण हवे
कोकणात ३८ टक्के उद्योग, प्रमुख बंदरे कोकणात आहेत. कोकण आर्थिक विकासाचा कणा आहे, तरी पायाभूत सुविधांची वानवा आहे. म्हणून समृद्ध कोकण संघटनेने स्वायत्त कोकण हवे अशी घोषणा झालेल्या परिषदेत केली. निधीचा योग्य विनियोग होत नाही. म्हणून कॉन्ट्रक्टर बाजूला करून तज्ज्ञांचा यामध्ये समावेश करून निधीचा योग्य वापर करावा, अशी मागणी आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 AM 20/Sep/2024