राजापूर : पाचल परिसरात विजेचा लपंडाव

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात मागील ४-५ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. यामुळे व्यापारी वर्गाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे व्यापारी आणि नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

पाचल येथे पोलिसांच्या उपस्थितीत महावितरणच्या अधिकाऱ्यांसमवेत व्यापारी आणि नागरिक यांच्यात बैठक झाली. यावेळी व्यापाऱ्यांनी विजेच्या सततच्या लपंडावामुळे आर्थिक नुकसान झाल्याचे तसेच नागरिकांनी विशेषतः महिलांनी अन्य असुविधांसह जीवनावश्यक असलेल्या पाण्याचाही पुरवठा होत नसल्याचे सांगितले. त्यावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक कारणे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नागरिकांनी वीज देयकांच्या वसुलीसाठी दाखवता तशी तत्परता वीजपुरवठा अखंडित राहण्यासाठी का दाखवत नाही ? असा प्रश्न विचारला. त्यावर अधिकारी निरुत्तर झाले. शेवटी अधिकाऱ्यांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी काही काळ लागेल असे सांगून एवढा अवधी देण्याची विनंती केली. या विनंतीला प्रतिसाद देताना ग्रामस्थांनी यापुढे वीजपुरवठा सुरळीत होण्याची मागणी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:42 AM 14/Oct/2024