उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या चिपळूण दौऱ्यावर

चिपळूण : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार दि. २१ सप्टेंबर रोजी चिपळूण दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते चिपळूणमध्ये एक दिवस मुक्काम करणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूणसह कोकणातील  रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जुन्या-नव्या लोकांशी ते संवाद साधणार असून, चिपळुणात जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने त्यांची जाहीर सभादेखील होणार आहे, अशी माहिती चिपळूण-संगमेश्वरचे आ. शेखर निकम यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील पागझरी येथील सभागृहात गुरुवारी सकाळी ११ वा. पत्रकार परिषद झाली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, युवकचे डॉ. राकेश चाळके, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, उदय चिखले, महिला राष्ट्रवादीच्या दिशा दाभोळकर, पांडुरंग माळी व अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आ. शेखर निकम म्हणाले की, सावर्डे येथे दु. ३ वा. त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन होईल. त्यानंतर ते चिपळूण येथील बहादूरशेख चौक येथील भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे पुतळ्याचे दर्शन घेतील. त्यानंतर जिप्सी कॉर्नर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे ते दर्शन घेतील आणि सायंकाळी ४ वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील मैदानात जनसन्मान यात्रेच्या निमित्त जाहीर सभा होईल. यावेळी प्रदेशाध्यक्ष व खा. सुनील तटकरे, पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, मंत्री आदिती तटकरे व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभा होणार आहे. सायंकाळी ७ वा. कापसाळ येथील माटे सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार विविध संघटना, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधतील. ज्यांना निवेदने द्यायची आहेत त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देखील यावेळी आ. शेखर निकम यांनी केले.

पवार साहेब दैवतच !
शरद पवार साहेब आपले कालही दैवत होते, आजही दैवत आहेत. त्यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही. मात्र, ते आता मनापुरतेच राहते. त्याचे भांडवल करणे गरजेचे नाही. पवार साहेबांची चिपळुणातील सभा पूर्णपणे राजकीय आहे. ज्यावेळी राजकीय सभा असेल त्यावेळी आपण तेथे जाणे कधीही उचित होणार नाही. ज्यावेळी वैयक्तिक काम असेल, संस्थेचे काम असेल त्यावेळी वेगळा विषय आहे. त्यामुळे उगाच कुणी म्हणायला नको की, ‘संभ्रम निर्माण करताहेत’ असा चिमटादेखील आ. शेखर निकम यांनी पत्रकार परिषदेत काढला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 20/Sep/2024