उन्हाळी हंगामात रत्नागिरीसह जिह्यातील ८ आगारास २८ कोटींचे उत्पन्न

रत्नागिरी : उन्हाळा हंगामात मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात एसटी बसेसला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. विशेषतः मे महिन्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टया असतात, नागरिक मूळ गावी, मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात येत असतात. त्यामुळे उन्हाळी हंगामात कोकणातील रत्नागिरीसह जिह्यातील ८ आगार मालामाल झाली असून तब्बल २८ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. गर्दीच्या हंगामात योग्य नियोजन, लांब पल्ल्याच्या मार्गावर जादा, नवीन बसेस सोडल्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी ३ टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने महिलांना ५० टक्के सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत सवलत दिले आहे. ही सवलत लागू केल्यानंतर तीन वर्षांत लालपरीला महिला, तरूणी, ज्येष्ठ नागरिकांचा प्रतिसाद मोठा मिळत आहे. त्याचबरोबर बिगर सवलतधारक यांचाही प्रतिसाद मोठा असतो, उन्हाळ्यात जास्ती करून प्रवासी खासगी ऐवजी लाडक्या लालपरीतून प्रवास करण्यास प्राधान्य देतात. उन्हाळी हंगामात एसटीने गावी, पर्यटनाला जाण्यासाठी प्रवाशांची मोठी गर्दी असते. विशेष करून एप्रील, में महिन्यात अधिक गर्दी होत असते. उन्हाळी हंगामाचा विचार करून रत्नागिरी आगारासह इतर आगाराकडून योग्य नियोजन करण्यात आले.

प्रसंगी लांब पल्ल्याच्या मार्गावर जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्याचा फायदा झाला असून विभागाला २७ कोटी ६१ लाख ८१ हजार असे सरासरी २८ कोटींचे उत्पन्न मिळाले असून मागील वर्षाच्या तुलनेत ३ टक्क्यांनी उत्पन्नात भर पडली आहे.

गुहागर, चिपळूण, रत्नागिरीची आघाडी
मे महिन्याच्या हंगामात गुहागार आगाराने बाजी मारली असून तब्बल ६ लाख ४६ हजार ३४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे तर त्यांनतर चिपळूण आगारास ५ लाख ४१ हजार ५४ रुपये, रत्नगिरी आगाराने ४ लाख ५६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. दापोली, खेड सरासरी तीन लाख, देवरूख अडीच लाख, राजापूर सव्वा दोन लाख रुपये, तर सर्वात कमी मंडणगड आगाराला दीड लाख रुपये, लांजा १ लाख ६८ रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे.

नवीन एसटी, ऑनलाईन बुकिंगचा फायदा
जिल्ह्यात नवीन बसेस आल्यामुळे त्याचा फायदा आगाराला होत होत आहे. कारण नवीन बसेस बसण्यासाठी चांगल्या आहेत शिवाय चार्जिग व विविध सुविधा आहेत. लांब पल्ल्याच्या अंतरावर नवीन एसटी बसेस सोडण्यात आल्या. तसेच उन्हाळ्याच्या हंगामात ऑनलाईन बुकींगचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे त्याचाही फायदा रत्नागिरी विभागाला झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 09/Jul/2025