कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणारा अटकेत

रत्नागिरी : कोकण कन्या एक्स्प्रेस (ट्रेन क्रमांक २०११२) मध्ये प्रवाशांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या एका आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाच्या गुन्हे आणि गुप्तचर शाखेने मोठ्या सतर्कतेने पकडले. आरोपीकडून चोरी केलेला ऐवज जप्त करण्यात आला असून, बेशुद्ध अवस्थेतील दोन प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ९ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ जुलै रोजी आरपीएफ रत्नागिरीचे निरीक्षक संजय वत्स, पीआर अमोल पाटील आणि पीआर कोकरे हे कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये गस्तीवर होते. दुपारी संगमेश्वर रेल्वे स्थानकावर ट्रेन थांबली असता, मोहम्मद उस्मान गनी आणि त्याचा मुलगा वसीम उद्दीन घनी (२५) हा मागील जनरल डब्यातून संशयास्पदरित्या उतरून स्लीपर कोचमध्ये चढताना दिसला असता पथकाने संशयितांना ताब्यात घेऊन चिपळूण स्थानकावर उतरवले. चिपळूण येथे आरपीएफने त्यांची कसून चौकशी केली असता, वसीम उद्दीन गनीने सांगितले की, तो बिहारचा रहिवासी असून, मुंबईतील अंधेरी येथील एका बांधकाम साईटवर काम करतो. त्याने सांगितले की, दादरमध्ये भेटलेल्या ‘राजू’ नावाच्या व्यक्तीने त्याला काही चॉकलेट्स देऊन मडगावला पाठवले होते. ‘राजू’च्या सांगण्यावरून तो ८ जुलै २०२५ रोजी मडगाव रेल्वे स्थानकावरून जनरल कोचमध्ये प्रवास करत होता.

प्रवासादरम्यान त्याने आपल्या शेजारी बसलेल्या दोन अनोळखी व्यक्तींशी मैत्री केली. त्यानंतर त्याने त्यांना दोन चॉकलेट्स दिली. रत्नागिरी स्टेशनजवळ दोन्ही प्रवासी बेशुद्ध पडल्यानंतर त्याने त्यांचे दोन मोबाईल आणि एका प्रवाशाची पर्स चोरली. ही गाडी संगमेश्वर स्थानकावर थांबली, तेव्हा तो डबा बदलून स्लीपर कोचमध्ये जात असतानाच त्याला पकडण्यात आले.

रत्नागिरी येथे आरोपीची पुन्हा चौकशी केली असता, त्याने विषारी औषध देऊन चोरी केल्याची कबुली दिली. निरीक्षक संजय वत्स यांनी त्याच्याकडून सर्व साहित्य जप्त केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:40 AM 10/Jul/2025