संगमेश्वर : तालुक्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांचे गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे एक कोटींपेक्षा अधिक कमिशन थकलेले आहे. त्यामुळे दुकानदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे दुकानदारांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली असून, संगमेश्वर तालुक्यात एकूण १३४ रास्त भाव धान्य दुकाने आहेत. यामध्ये अनेक सहकारी संस्था आणि बचत गट यांचाही समावेश आहे, जे शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा अविभाज्य भाग म्हणून नागरिकांना रास्त दरात धान्य पुरवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात.
मात्र, गेले सहा महिने कमिशन न मिळाल्याने या सर्व दुकानदारांवर मोठा आर्थिक बोजा पडला आहे. यामुळे घरखर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन, दुकानाचे भाडे आणि इतर दैनंदिन खर्च भागवणे दुकानदारांना कठीण झाले आहे.
शासनाच्या धोरणात्मक बदलांमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. यामुळे दुकानदारांमध्ये संभ्रम आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात दुकानदारांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. अनेकवेळा निवेदने देण्यात आली. तसेच संघटनांच्यावतीने वारंवार भेटी घेऊन कमिशन लवकरात लवकर अदा करण्याची मागणी केली आहे. मात्र, केवळ आश्वासनांपलीकडे काहीही हाती लागत नसल्याने दुकानदार हवालदिल झाले आहेत.
तोडगा काढण्याची संघटनेची मागणी
रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेने या थकीत कमिशन प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा फटका बसलेला असून, त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने यावर तातडीने तोडगा काढून, दुकानदारांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेकडून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:00 PM 14/Jul/2025














