राजापूर : कोदवली नदीकिनारी सापडलेली एकपाषाणी मंदिरे ही शैव पाशुपत संप्रदायातील महत्त्वाची अधिष्ठान केंद्रे असावीत, असा निर्वाळा इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांनी दिला आहे. कोदवली गावात एकूण सात एकाश्म मंदिरे नव्याने सापडली असून एक एकाश्म मंदिर देवाचे गोठणे सोगमवाडी येथे आढळून आले आहे, तर यापूर्वी काही पांगरे येथेही अशी एकाश्म मंदिरे व लेणी सापडली होती. त्यावरून राजापूर हे पाशुपत संप्रदायाचे अधिष्ठान केंद्र असल्याचे दिसून येते.
कोदवली येथे साहेबाच्या धरणाजवळ एकूण चार एकाश्म मंदिरे आढळून आली असून त्यातील दोन्ही पूर्ण अवस्थेत असून दुसरी दोन्ही प्राथमिक आणि अर्थ अवस्थेत आहेत. एकाश्म मंदिर खोदण्याची प्रारंभिक सुरुवात कशी होते याचे हे उत्तम उदाहरण असून यात सुरुवातीला दरवाजाचा भाग खोदला गेलेला आहे. दुसरे मंदिर हे त्याच्याच बाजूला असून ते ७० टक्के खोदून पूर्ण केले आहे, त्याचा दरवाजा आणि गर्भगृह असे दोन भाग दिसून येतात.
तर तिसरे मंदिर हे पूर्ण अवस्थेत असून त्याचा दरवाजा गर्भगृहात अधिष्ठान असून ते चौकोनी आकाराचे आहे. अधिष्ठानावर गोलाकार खड्डा असून त्यावर तेथे ग्रेनाईट शिवलिंग बसवलेले असावे. चौथे मंदिर हे आकाराने लहान असून ते अपूर्ण अवस्थेत आहे. यातील प्रवेशद्वार व गर्भगृह एका चौकटीत बसवलेले आहे. कोदवली शंकरेश्वराच्या मंदिराजवळ आढळलेले एकाश्म मंदिरे हे मंदिर पूर्ण जांभ्या दगडात असून ग्रामस्थांनी सध्या मात्र त्यावरती प्लास्टर केलेले आहे. मंदिरास आयताकृती प्रवेशद्वार असून आतमध्ये चौकोनी गर्भगृह आहे
प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला लगेचच अधिष्ठान असून त्यावरती चौकोनी आकाराचे शिवलिंग कोरलेले आहे. शिवलिंगातील अभिषेकाचे पाणी बाहेर जाण्यासाठी मंदिरास एक वारी मार्ग तयार केलेला असून गर्भगृहातील छताची रचना ही गजपुष्टाकार आहे. मंदिराचा कळस मात्र त्रिकोणी पिरॅमिडप्रमाणे निमुळता होत गेलेला दिसतो.
तर कोदवली मांडवकरवाडी येथे ब्राम्हणदेव व्हाळाजवळ दोन एकाश्म मंदिरे आढळुन आली आहेत. ही दोन्ही मंदिरे आकाराने मोठी असून यांचे दोन्ही दरवाजे आकाराने चौकोनी स्वरूपाचे आहेत. आतील गर्भगृह चोकोनी असून आतमध्ये कोणतीही देवता किवा अधिष्ठान कोरलेले नाही.
राजापूर शहरापासून साधारण १० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या देवाचे गोठणे सोगमवाडी येथेही नागधोबा नावाने प्रसिद्ध असणारे एकाश्म मंदिर आढळून आले असून हे मंदिरही आकाराने मध्यम स्वरुपाचे आहे. याचा दरवाजाही चौकोणी असून आतील गर्भगृहात चौथरा आहे व त्यावरच अधिष्ठान देवता कोरलेली आहे. स्थानिक लोक त्याला नागधोबा नावाने ओळखतात.
काही वर्षांपूर्वी अशीच काही एकाश्म मंदिरे तालुक्यातील पांगरे बुद्रुक येथे आढळून आली आहेत. या सगळ्या एकाश्म मंदिरांचा विचार करता राजापूर हे पाशुपत संप्रदायाच्या काळात अधिष्ठान केंद्र असल्याचे दिसून येते.
एकाश्म मंदिर म्हणजे काय?
एकाच शिलाखंडातून मंदिराची संपूर्ण वास्तू अंतर बाह्य स्वरूपात साकार करणे म्हणजे एक पाषाणी मंदिर घडवणे होय. एक पाषाणी मंदिरेही गिरीशिल्पाच्या कल्पनेचा अंतिम अविष्कार समजला जातो, एक पाषाणी मंदिर ही
एक प्रकारे मूर्तिशिल्प या प्रकारात येतात. एका अखंड शिळेतून नको असलेला भाग खोदून तयार केलेल्या स्थापत्यास एकाश्म मंदिर असे म्हणतात. यात शाला आच्छादन, गर्भग्रह, स्तंभ, सभामंडप, शिखर, अधिष्ठान हे सर्व घटक एकाच पाषाणात निर्माण केलेले असतात, मात्र लयन स्थापत्य आणि एकाश्म मंदिर यात फरक असतो. चौथ्या व पाचव्या शतकात शेव व वैष्णव पंथाचा प्रभाव वाढलेला पाहायला मिळतो. पुढे सहाव्या शतकात या चळवळीने जास्त जोर घेतलेला दिसतो. कोकणात बऱ्याच ठिकाणी अशा मंदिरांची निर्मिती झालेली दिसते. या शोधकार्यात पत्रकार विनोद पवार, शिवाजी कुंभार, संदीप राऊत, प्रा. अंजय धनावडे यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याची माहिती अनिल दुधाने यांनी दिली आहे.
कोकण जसे निसर्गाने समृद्ध आहे तसे विविध चमत्कारानेसुद्धा भरलेले आहे. अश्मयुगापासून इसवी सनाच्या पूर्वकाळापर्यंत मानवी संस्कृतीचा घटक म्हणून सापडलेली कातळ शिल्पे व पुरातत्त्व वारशाची खाण म्हणजे कोकण भूमी असून आता सापडलेली एकाश्म मंदिरे हा राजापूरच्या प्राचिन अर्वाचिन काळाचा ठेवाच आहे- अनिल दुधाने, इतिहास संशोधक, पुणे
या मंदिरांच्या अभ्यासाअंती प्रसिद्ध इतिहास संशोधक अनिल दुधाणे यांची काही निरीक्षणे
राजापूर हे प्राचीन काळापासून व्यापारी बंदर असून येथील अर्जुना नदीच्या खाडीमागे राजापूरपर्यंत व्यापारी माल येऊन तो पश्चिम घाटमाथामार्गे कोल्हापूर परिसरात जात होता. याच मार्गावर ही एकाश्म मंदिर स्थापन केलेली दिसतात.
सर्व मंदिरांची रचना पाहता हे एक धार्मिक उपासनेचं केंद्र असावं याचबरोबर हे निर्जन मानवी वस्तीपासून थोडेसे दूर अंतरावर पाण्याच्या प्रवाहापाशी जंगलात स्थापन केलेली आहेत.
साधारणतः चार ते पाच साधक एकत्र साधना करू शकतील, इतकीच त्यांची मर्यादा आहे.
या मंदिरातील अधिष्ठान रचना पाहता हे शैव पाशुपत संप्रदायातील महत्त्वाचे केंद्र असावे.
राजापूरची गंगा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. तिथे साक्षात गंगा प्रकट होते. या ठिकाणी धोपेश्वराचं प्राचीन मंदिरदेखील आहे. तसेच पांगरे बुद्रुक येथे सापडलेली लेणी ही पाचव्या ते सहाव्या शतकातील असल्यामुळे हे एक शैव केंद्र असावे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:15 PM 14/Jul/2025














