उपमुख्यमंत्री अजित पवार आज चिपळुणात

चिपळूण : जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार शनिवारी (ता. २१) चिपळुणात येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्याची जय्यत तयारी केली आहे.

या निमित्ताने शहरात बाईक रॅली काढण्यात येणार असून, ठिकठिकाणी पवार यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे तसेच इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात होणाऱ्या जाहीर सभेत पवार महिलांशी संवाद साधणार आहेत.

उपमुख्यमंत्री पवार हेलिकॉप्टरने शनिवारी दुपारी ३ वा. सावर्डेत दाखल होणार आहेत. सावर्डे बसस्थानक, चिपळुणातील पाग येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. बहादूरशेखनाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर तेथून सांस्कृतिक केंद्रापर्यंत बाईक रॅली निघेल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर श्री भैरी देवस्थान मंदिरास भेट देणार आहेत. त्यानंतर ४.३० वा. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रासमोरील पटांगणात होणाऱ्या जनसन्मान यात्रेत लाडक्या बहिणींशी ते संवाद साधणार आहेत. त्यानंतर शिवसेनेचे शहराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या कार्यालयास उपमुख्यमंत्री पवार भेट देणार आहेत. शहरातील मुस्लिम समाज हॉलमध्ये समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत.