Manikrao Kokate : राजीनामा देण्यासाठी मी काय विनयभंग केला की चोऱ्यामाऱ्या : मंत्री माणिकराव कोकाटे 

सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ असो किंवा शेतकऱ्यांबद्दलची आक्षेपार्ह विधाने.. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना चर्चेत कसं रहायचं ते नीट समजतं. काही दिवसांपूर्वीच कोकाटे यांचा सभागृहात रमी ( पत्ते) खेळतानाचा एक व्हिडीओ समोर आला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनी तो व्हिडीओ ट्विट केल्यावर प्रचंड खळबळ माजली, विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला, राज्यातील वातावरण पेटल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही हे योग्य नसल्याचे स्पष्ट केले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही कोकाटेंना समज द्यावी लागली. मात्र एवढं सगळ होऊनही आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे यांच्या चेहऱ्यावर जराही पश्चाताप किंवा चिंता दिसत नव्हती.

रमी खेळण्याच्या मुद्यावरून विरोधकांकाडून कोकाटेंच्या राजनाम्याची मागणी होत असताना ते मात्र निवांतपणे बसून आपल्या कृत्यांचं स्पष्टीकरण देत तो मी नव्हेच, मी ते केलंच नाही असा राग आळवत होते. हा इतका छोटा विषय आहे. हा विषय लांबला का कळलं नाही. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत मी रमी खेळलो नाही. मला रमी खेळताच येत नाही असा दावा कोकाटेंनी केला.

राजीनामा देण्यासारखं घडलं काय ?

Shoping fest Khabardar

एवढंच नव्हे तर राजीनामा देण्यासारखं घडलं काय. मी काही विनयभंग केला आहे. चोरी केली आहे. माझी काय पार्श्वभूमी गुन्हेगारीची नाही. मी केलं काय ? असा सवालही विचारत कोकाटेंनी थेट हात वर केले.
ज्या विरोधकाने जो व्हिडीओ काढला त्याला मी कोर्टात खेचणारच आहे. साधा पाय घसरला तरी त्याची चर्चा होते. प्रतिक्रिया सुरू होतात. दारू प्याला असेल, गांजा प्यायला असेल अशा काहीही सोशल मीडियात प्रतिक्रिया येतात.

मला रमी खेळताच येत नाही

ऑनलाइन रमी खेळताना मोबाईल नंबर अटॅच पाहिजे. बँकेचं अकाऊंट अटॅच पाहिजे. अशा प्रकारचं कोणताही मोबाईल नंबर आणि अकाऊंट माझं अटॅच नाही. माझे बँकेचे अकाऊंट देणार आहे. कुठेही चौकशी करा. ऑनलाईन रमी सुरू झाल्यापासून आजपर्यंत एक रुपयाची रमी खेळलो नाही. मला रमी खेळता येत नाही. हा आरोप चुकीचा आणि बिनबुडाचा आहे. अँड्राईड मोबाईल आहे , 5जी आहे. काही टच झालं तर भलतंच काही तरी दिसतं. स्किप करेपर्यंत माझा दहा पंधरा सेकंदाचा वेळ गेला असेल अशी सारवासारव करण्याचा प्रयत्नही कोकाटे यांनी केला. तसेच ज्या राजकीय नेत्यांनी आरोप केला आणि माझी बदनामी केली. त्यांना मी कोर्टात खेचणार असा इशारा कोकाटे यांनी दिला.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांना पत्र देणार आहे. चौकशी करण्याची मागणी करणार आहे. मी दोषी आढळलो तर नागपूरच्या अधिवेशनात मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालांना राजीनामा देईनअसेही ते म्हणाले.

या प्रकरणाची चौकशी करा

व्हिडीओ कुणी काढला त्यात मला जायचं नाही. सभापती त्याची चौकशी करतील. त्यात काही नाही. ज्यामुळे शेतकरी आणि छावा संघटनेच्या भावना दुखावतील. मी वेडंवाकडं काही केलं नाही. शेतकऱ्यांशी संबंध नाही अशा गोष्टी दाखवल्या गेल्या. दोषींचे सीडीआर चेक करा. जे कोणी भाग घेतला ते समोर येऊ द्या. कृषी मंत्री म्हणून वारंवार समोर आणलं जातं, त्याची चौकशी करावी, अशी मागणी कोकाटे यांनी केली.

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार. तुम्ही राज्यभर माझी बदनाम केली. तुम्ही अशी कशी एखाद्या मंत्र्याची बदनामी करता. चौकशीत जे असेल ते सत्य बाहेर येईल. कोण कोण नेते कोणा कोणाशी बोलतात याचा सीडीआर काढण्याची विनंती करणार आहे. माझ्याबाबतीत असा इतिहास आहे की माझ्याविरोधात चुकीचे असे काही सापडलेले नाही, असे माणिकराव कोकाटे म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 22-07-2025