हेमंत वणजु जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष; व्यापारी आणि वैश्य समाजात आनंदाचे वातावरण

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजु यांची निवड झाल्याबद्दल रत्नागिरीतील व्यापारी आणि वैश्य समाजातील युवा वर्गाने आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या या निवडीमुळे सहकार क्षेत्राला अधिक गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हेमंत वणजु हे रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे सल्लागार असून, जिल्ह्यातील व्यापारी बांधवांच्या अडचणींमध्ये ते नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे असतात. तसेच, वैश्य समाजातील युवा वर्गाला विविध सामाजिक आणि व्यावसायिक उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पाठिंबा मिळत असतो. त्यामुळे त्यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने व्यापारी आणि युवा वर्गामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर हेमंत वणजु यांचा शहरातील श्री राधाकृष्ण मंदिरात व्यापारी आणि वैश्य युवा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभाला मोठ्या संख्येने शहरातील व्यापारी आणि वैश्य समाजातील तरुण उपस्थित होते.

यावेळी बोलताना हेमंत वणजु यांनी, “जास्तीत जास्त व्यापारी आणि तरुणांनी सहकार क्षेत्रात यावे,” अशी कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांची भूमिका असल्याचे सांगितले. त्यांच्या या भूमिकेमुळे सहकार क्षेत्राचा विस्तार होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Ratnagiri Khabardar add image