दापोली : हर्णे बंदरामधून (ता. १) नव्या मासेमारी हंगामाला उत्साहात सुरुवात झाली. सकाळपासूनच किनाऱ्यावर मच्छीमारांची लगबग सुरू होती आणि सुमारे ५० हून अधिक नौका समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्या. महाराष्ट्रातील दोन महिन्यांच्या मासेमारी बंदीची मुदत ३१ जुलैला संपली. या बंदी कालावधीत मच्छीमार नौकांची डागडुजी, जाळींची तयारी, डिझेल व इतर आवश्यक सामग्रीची जमवाजमव यामध्ये गुंतले होते. यंदाच्या हंगामाकडून चांगल्या उत्पादनाची आशा आहे.
सध्या कोकण किनारपट्टीवर वातावरण अनुकूल असले तरी काही भागांत वादळीवाऱ्याचा इशारा असल्याने नौकांवर नियंत्रण व सतर्कतेची आवश्यकता आहे. मासेमारीसाठी सध्या अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे आज अनेक मच्छीमारांनी मुहूर्त केला आहे. असेच वातावरण या हंगामात मिळाले तर मासळी चांगल्याप्रकारे मिळू शकते आणि बहुतांश मच्छीमार या हंगामात उद्योगात उतरतील, असा विश्वास मच्छीमार बांधवांनी व्यक्त केला आहे. गेल्यावर्षी सुरुवातीचे वातावरण खराब असल्याने मुहूर्त टळला होता.
आंजर्ले खाडीला काल सकाळी ओहोटी लागेल, याची कल्पना मच्छीमारांना आधीच असल्याने किमान ५०हून अधिक मच्छीमारांनी आधीच म्हणजे गुरुवारी सायंकाळी भरतीच्यावेळेस नौका खाडीतून बाहेर काढून किल्ल्याजवळ नेल्या व काल सकाळी मासेमारीला गेले.
दरम्यान, दापोलीमधील मच्छीमार समुद्रात गेले असले तरी गुहागर, राजापूर, रत्नागिरी येथील मच्छीमार मोठ्या संख्येने समुद्रात गेलेले नाहीत. बदलते वातावरण आणि जोरदार वाऱ्यामुळे या मच्छीमारांनी आणखी काही दिवस थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
ऑगस्ट-सप्टेंबर महत्त्वाचे महिने
कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई या जिल्ह्यांत मासेमारी मोठ्या प्रमाणावर होते. ऑगस्ट व सप्टेंबर हे दोन महिने मच्छीमारांसाठी अत्यंत निर्णायक असतात. या काळात पापलेट, बांगडा, सुरमई, कोळंबी, हलवा, मांदेलीसारख्या प्रजाती भरपूर मिळतात आणि बाजारात चांगल्या दराने विकल्या जातात.
आज किमान ५० नौका मासेमारीला गेल्या आहेत. भरतीच्या वेळेसच नौका किल्ल्याजवळ बाहेर काढून घेतल्या गेल्या आणि काल सर्व मासेमारीला गेले आहेत. वातावरण चांगले होते. त्यामुळे बऱ्यापैकी मासळी मिळेल अशी आशा आहे- प्रकाश रघुवीर, उपाध्यक्ष, हर्णे बंदर कमिटी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:00 PM 02/Aug/2025














