संगमेश्वर : महामार्गाबाबत मागण्या मान्य झाल्याने राहुल गुरव यांचे उपोषण मागे

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या कामांतील गंभीर त्रुटींविरोधात संगमेश्वर सोनवी चौक येथे सामाजिक कार्यकर्ते राहुल गुरव यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले.

महामार्गावर जागोजागी खड्डे, नुकत्याच पूर्ण झालेल्या काँक्रिट रस्त्यांना पडलेले तडे, अपूर्ण आणि असुरक्षित संरक्षक भिंती तसेच शाळकरी मुलांसाठी उभारण्यात आलेल्या निवारा शेड्सची झालेली दुरवस्था या सर्व मुद्द्यांकडे प्रशासनाने वारंवार सूचना दिल्यानंतरही दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. गुरव यांनी आपल्या उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाच्या गलथान कारभाराची पोलखोल केली.

कामे सुरू करण्याआधी नियोजनाचा अभाव व नंतर देखरेखीतील निष्काळजीपणा यामुळे स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेशी खेळ चालला आहे, असे त्यांनी सांगितले. स्थानिक जनतादेखील मोठ्या प्रमाणावर या आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

राजेंद्र पोमेडकर तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी यांनी उपोषणस्थळी येऊन गुरव यांची भेट घेत पाठिंबा दर्शवला. गुरव यांनी सांगितले, प्रशासनाने आज त्यांच्या मागण्या मान्य केल्याचे लेखी आश्वासन दिले. त्यामुळे गुरव यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 AM 13/Aug/2025