रत्नागिरी : जिल्ह्यातील वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत झालेल्या शौचालय घोटाळ्याप्रकरणी तीन वर्षांहून अधिक काळ उलटूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याने, या विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार निलेश रहाटे यांनी १४ ऑगस्ट रोजी सीबीडी बेलापूर येथे उपोषणाचा इशारा दिला आहे.
निलेश रहाटे यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या पुराव्यांनुसार, वाटद-मिरवणे ग्रामपंचायतीमध्ये शौचालय बांधकामासाठी आलेल्या लाखो रुपयांच्या निधीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांमध्ये नोटरी प्रतिज्ञापत्रे, बनावट बिलांची यादी, तसेच सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि ग्रामसेवक यांनी घेतलेल्या बेकायदेशीर लाभांचा समावेश आहे.
या प्रकरणी त्यांनी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, पालकमंत्री आणि आमदारांना वारंवार तक्रारी देऊनही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट, आतापर्यंत दिशाभूल करणारे अहवाल तयार करून दोषींना वाचवण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप रहाटे यांनी केला आहे.
या घोटाळ्याची चौकशी सुरू असताना आणि तत्कालीन सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची टांगती तलवार असताना, त्याच तत्कालीन सरपंचाला जिल्हा परिषदेमार्फत (ZP) ठेकेदारीचा परवाना देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या
या उपोषणादरम्यान निलेश रहाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रशासनाकडे काही ठाम मागण्या केल्या आहेत: १. या घोटाळ्यातील दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावेत. २. भ्रष्टाचाराची अंतिम चौकशी पूर्ण होऊन निर्णय लागेपर्यंत तत्कालीन सरपंचाचा ठेकेदारी परवाना (लायसन्स) तात्पुरता स्थगित करावा. ३. या प्रकरणी चुकीचे व दिशाभूल करणारे अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
“सरकारवर माझा विश्वास आहे, पण सरकारनेही नागरिकांच्या तक्रारींवर विश्वास दाखवून न्याय मिळवून द्यावा,” असे सांगत, “जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही,” असा निर्धार निलेश रहाटे यांनी व्यक्त केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 13-08-2025












