रत्नागिरी तालुका भंडारी संघाचे स्वातंत्र्यदिनी उपोषण

रत्नागिरी : उच्च न्यायालयाच्या दावा नं. ८०७/१९४७ च्या निकालातील इतर जागा ज्याप्रमाणे श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या वारसांच्या ताब्यात मिळाल्या त्याच दाव्यातील उर्वरित मिळकतींचा ताबा कीर यांच्या वंशजांना देण्यात यावा.

अनेक महिने वयोवृद्ध वंशजांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वारंवार संपर्क करूनही उच न्यायालयाच्या आदेशाचे पालन केलेले नाही. स्वातंत्र्यदिनापूर्वी ही कार्यवाही पूर्ण करून द्यावी; अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय उच्च न्यायालयाचा अवमान करून वयोवृद्ध नागरिकांची हेळसांड करत असल्याच्या निषेधार्थ भागोजीशेठ कीरप्रेमी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करू, असा इशारा रत्नागिरी तालुका भंडारी समाजसंघाने दिला. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

निवेदनात म्हटले आहे की, भक्तिभूषण दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या स्वसंपादित मिळकती शेठजींच्या २४ फेब्रुवारी १९४४च्या निधनानंतर सूट क्र. ८०७/१९४७ नुसार उच्च न्यायालय कोर्ट रीसिव्हरच्या ताब्यात गेल्या होत्या. त्याचा निकाल २००४ ला लागला. त्यानुसार दाव्यातील सर्व मिळकती वारसांच्या नावे करून ताब्यात देण्याचा आदेश असताना दाव्यातील काही मिळकती नावावर झाल्या. उर्वरित मिळकती अद्याप ताब्यात दिलेल्या नाहीत. त्यासाठी वारंवार कार्यालयाकडे कागदोपत्री व प्रत्यक्ष संपर्क करूनही कार्यवाही पूर्ण झालेली नाही. उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांना निवेदन देऊन संपूर्ण वस्तुस्थिती, घटनाक्रम त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी प्रत्यक्ष भेटीदरम्यान सांगितले.
स्वातंत्र्यदिनापूर्वी ही कार्यवाही झाली नाही, तर १५ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण छेडू. वयोवृद्ध, वंशज आणि नागरिक यांचे काही बरे-वाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर असेल, असेही निवेदनात म्हटले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 14-08-2025