खेड : तालुक्यातील ऐतिहासिक व दुर्गम रसाळगड किल्ल्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शासनाने मंजूर केलेल्या जनसुविधा केंद्राच्या कामाला अखेर गती मिळणार आहे.
वन विभाग व पुरातत्त्व विभाग यांच्यातील जागेसंदर्भातील वादामुळे आठ महिन्यांपासून हे काम ठप्प होते. याबाबत ‘सकाळ’ने वन विभागाची मनमानी” या आशयाचे वृत्त प्रसिद्ध केले होते, त्याची दखल घेण्यात आली आहे.
या विषयाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी घेरारसाळगड येथील शिवभक्त रामचंद्र आखाडे यांनी महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच, रत्नागिरीच्या बॅनरखाली १५ ऑगस्टला तहसील कार्यालय, खेड येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या आंदोलनाच्या इशाऱ्याची ‘सकाळ’च्या वृत्तामुळे शासनाच्या पुरातत्त्व व वनविभागाने दखल घेतली. तातडीने दोन बैठका घेऊन रामचंद्र आखाडे व सहकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली. अखेर दोन्ही विभागांनी महिन्यात परवानगी प्रक्रियेची ऑनलाईन पूर्तता करून थांबलेले काम तातडीने सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले. या ठोस आश्वासनानंतर आखाडे यांनी १५ ऑगस्टचे उपोषण तात्पुरते स्थगित केल्याचे जाहीर केले. याप्रसंगी त्यांनी ग्रामपंचायत घेरारसाळगड, परिक्षेत्र वन विभाग दापोली, पुरातत्त्व विभाग रत्नागिरी, तहसीलदार कार्यालय खेड, खेड पोलिस ठाणे, सर्व पत्रकार, सहकारी व राज्यातील सर्व शिवभक्तांचे आभार मानले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:26 14-08-2025












