राजापूर : नुकत्याच मुंबई अंधेरी येथे महाराष्ट्र राज्य दहिहंडी गोविंदा असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धा वेगवान गोविंदाची (GET SET GO) या महिलांच्या सहा थरांच्या राज्यस्तरिय दहिहंडी स्पर्धेत शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर ने रत्नागिरी जिल्हाचे प्रतिनिधित्व करीत, राज्यातील आघाडीच्या ८ महिला संघांमध्ये उपविजेते पद पटकावले आहे.
प्रथम ५ थर यशस्वी आणि जलदगतीने लावल्याने त्यांची अंतिम संधानमध्ये निवड झाली. त्यानंतर अंतिम फेरीमध्ये यशस्वी वेगवान सहा मनोरे रचुन त्यांनी या स्पर्धेत उपविजेते पदक पटकावले आहे.
राजापूर सारख्या ग्रामीण भागातून पुरुषांची मक्तेदारी असलेल्या दहिहंडी सारख्या खेळात राजापूरच्या या रणरागीनींनी राजापूरचे नाव, मुबंईसह महाराष्ट्रात मोठे केले आहे. शिवशक्ती महिला गोविंदा पथक राजापूर या मंडळाची स्थापना २००५ साली झाली, त्यानंतर बरेच वर्ष रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्हांनमध्ये जावून आजवर या पथकाने यशस्वी मनोरे रचले. गेल्या ८ वर्षापासून या पथकाचा मुंबई मध्ये डोंबिवली येथे सराव होतो आणि या पथकामध्ये राजापूर, लांजा, रत्नागिरी, चिपळूण, खेड तसेच सिंधुदुर्ग जिल्हयातील विविध खेळांच्या महिला खेळाडू सरावासाठी, मुंबई येथे जात असतात. कामानिमित्त मुंबई स्थित असलेल्या सर्व महिला खेळाडू तसेच राजापूरात स्थायिक असलेल्या महिला खेळाडूचा देखील यात समावेश आहे.
महिलांसाठी महाराष्ट्र राज्य दहिहंडी असोसिएशन वेगळी स्पर्धा सुरु केली. पहिल्यावर्षी महिलांसाठी हि स्पर्धा ५ थरांची होती. प्रो-गोविंदा मध्ये महिलांचा समावेश होण्यासाठी ६ थर लावणारी महिला पथक जास्तीत जास्त तयार व्हावी आणि प्रो-सारख्या इव्हेट मध्ये महिलांचा समावेश होण्याच्या दृष्टीने यावर्षी सहा थरांची स्पर्धा ठेवली गेली होती. या स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी सहभाग घेवून यावर्षी राजापूरच्या या महिला पथकाने यशस्वी ६ थर लावून उपविजेतेपद मिळवले त्यामुळे आपल्या राजापूरच्या या महिला पथकाचा महिलांच्या प्रो-गोविंदा मध्ये समावेश होण्यासाठी आपली दावेदारी सिध्द केली आहे. या स्पर्धेत सहाव्या थरात जाणारी गोपिका हि राजापुर कोदवली येथील प्रसिद्ध मुर्तीकार विजय मांडवकर यांची सुकन्या कल्याणी विजय मांडवकर होती. यासाठी सर्वच महिला गोविंदानी परिश्रम घेतल्याचे मंडळाचे संयोजक व प्रशिक्षक प्रतिक अशोक गुरव यांनी सांगितले.
यासाठी मंडळाचे प्रायोजक राजापुर हायवे किचनचे मालक संदेश करंगुटकर यांनी मोलाचे आर्थिक सहकार्य केले. हे महिला पथक १५ ऑगस्ट रोजी पुणे येथे दहिहंडी स्पर्धेसाठी जाणार आहे, तर १६ ऑगस्ट गोपाळकाच्या दिवशी राजापुर, आणि सिंधुदुर्ग येथे हे पथका जाणार आहे असे मंडळाच्या अध्यक्षा सौ. आर्या करंगुटकर यांनी सांगितले. या पथकाच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:48 PM 14/Aug/2025












