आंबा घाटात दोन गव्यांची झुंज; कड्यावरून पडून दोघांचाही मृत्यू

देवरुख : आंबा घाटात दोन गव्यांच्या झुंजीत कड्यावरून पडून दोघांचाही मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ९ वाजता आंबा घाटातील कळकदरा या ठिकाणी घडली.

रत्नागिरी-साखरपा- कोल्हापूरकडे जाणाऱ्या (कळकदरा) महामार्गावर हायवेच्या उजव्या बाजूला दोन गवे झुंजी दरम्यान कड्यावरून पडून मृत झाले असल्याची माहिती वनरक्षक वन उपज तपासणी नाका साखरपा यांनी संगमेश्वर वनपाल यांना दिली. मिळालेली माहिती वरिष्ठांना देऊन सर्व स्टाफसह साहित्यासह जागेवर जाऊन खात्री करता सदरठिकाणी दोन गवे मृत अवस्थेत पडले असल्याचे
आढळून आले. पशुधन विकास अधिकारी पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक दाभोळे यांना बोलावून त्यांच्याकडून शवविच्छेदन करून घेतले. शवविच्छेदनात सदर गव्यांचा मृत्यू हा झुंजीदरम्यान पडून झालेला असल्याबाबत पशुवैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले.

शवविच्छेदन झाल्यानंतर या मृत दोन गव्यांचे सर्व अवयव घटना घडलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर सुरक्षित ठिकाणी आणून जाळून नष्ट करण्यात आले. यावेळी घटनास्थळी रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, संगमेश्वर देवरुख परिमंडळ वन अधिकारी न्हानू गावडे, साखरपा वनरक्षक सहयोग कराडे, फुणगूस वनरक्षक आकाश कडूकर, दाभोळे वनरक्षक सुप्रिया काळे, आरवली वनरक्षक सूरज तेली, वन उपज तपासणी नाका साखरपा वनरक्षक रणजीत पाटील, महादेव जलने, मिताली कुबल, प्राणी मित्र महेश धोत्रे, दिलीप गुरव उपस्थित होते. ही कार्यवाही रत्नागिरी चिपळूण विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई तसेच रत्नागिरी चिपळूण सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 15/Aug/2025