जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष हेमंत वणजु यांचा उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा सहकारी बोर्डाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजु यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या निवडीमुळे सहकार क्षेत्रात एका पत्रकाराला संधी मिळाल्याने सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

जिल्हा सहकारी बोर्डाच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनेलने ऐतिहासिक विजय मिळवला होता. कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे आणि माजी अध्यक्ष प्रभाकर शेट्ये यांच्या कुशल नेतृत्वाखाली पॅनेलने १७ पैकी तब्बल १६ जागांवर दणदणीत विजय मिळवत बोर्डावरील आपले वर्चस्व सिद्ध केले होते. या अभूतपूर्व विजयानंतर, पॅनेलचे नेते कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या मान्यतेने आणि सर्व सदस्यांच्या एकमताने हेमंत वणजु यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली.

या सत्कार समारंभावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हेमंत वणजु यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अलीमिया काझी, विजय खेडेकर, दीपक पवार, मुश्ताक खान, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, शिवसेनेचे नेते बंड्या साळवी, बिपीन बंदरकर, दिनेश सावंत यांच्यासह पत्रकारिता आणि सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

हेमंत वणजु यांचा पत्रकारितेतील प्रदीर्घ अनुभव आणि सहकार क्षेत्रातील अभ्यास पाहता, त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा सहकारी बोर्ड सहकाराच्या बळकटीकरणासाठी निश्चितच मोठे योगदान देईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Shree clinic

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:39 15-08-2025