जामनगर एक्सप्रेसमध्ये प्रवासी महिलेला लागली डुलकी, चोरट्याने १.७० लाखांचे दागिने केले लंपास!

रत्नागिरी : धावत्या रेल्वे गाडीत प्रवाशांच्या झोपेचा फायदा घेऊन मौल्यवान ऐवज लंपास करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जामनगर एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईतील एका गृहिणीला प्रवासात डुलकी लागताच, अज्ञात चोरट्याने तिच्या बॅगेतील तब्बल १ लाख ७० हजार रुपये किमतीची सोन्याची चेन चोरून नेल्याची घटना रत्नागिरी रेल्वे स्थानकात उघडकीस आली आहे.

याप्रकरणी सदले वादीक अनंता पेरुमाल कोनर (वय ३४, रा. चेंबूर, मुंबई) यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोनर या मंगळवारी, दिनांक १२ ऑगस्ट रोजी सकाळी जामनगर एक्सप्रेसच्या (गाडी क्र. १९५७७) एस-७ कोचमधून प्रवास करत होत्या. पहाटेच्या वेळी त्यांना झोप लागली होती.

सकाळी सुमारे ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास गाडी रत्नागिरी रेल्वे स्थानकात थांबली. याचवेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या झोपेचा फायदा घेतला. त्यांनी सीटच्या खाली ठेवलेल्या बॅगेतील निळ्या रंगाची ज्वेलरी पाऊच (पर्स) अलगद काढून घेतली. या पाऊचमध्ये ५७ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि त्याला तमिळ ‘ओम’ आकाराचे पेंडल होते, ज्याची एकूण किंमत १,७०,००० रुपये होती. प्रवास संपल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला.

त्यानंतर गुरुवारी, १४ ऑगस्ट रोजी त्यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (क) नुसार गुन्हा (गु.र.नं. ३४७/२०२५) दाखल केला आहे. रेल्वे स्थानकाच्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या चोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:00 15-08-2025