दापोली : महावितरण विरोधात नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

दापोली : दापोली तालुक्यातील शिवाजी नगर, शिवनारी, साखळोली, सडवे, कोळबांद्रे या पंचक्रोशीतील गावांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. रात्री 12.30 वा. ते सकाळी 6.00 वा. वीज खंडित राहणे, तसेच दिवसाही कोणतीही पूर्वसूचना न देता वीज जाणे, यामुळे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

वीज नसल्याने शेतकऱ्यांचे पंप बंद पडले असून, पिण्याच्या पाणीपुरवठा योजना भर पावसात सतत बंद ठेवाव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. शाळा, महाविद्यालये, तसेच विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अभ्यास विस्कळीत होत असून, दळणवळण, टेलिफोन, इंटरनेट सेवाही खंडीत झाल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र, क्लिनिक, मेडिकल, दवाखाने येथे औषधांच्या साठवणुकीस अडचणी येत आहेत. पूर्वी कार्यरत असलेले स्थानिक वायरमन बदलून नवीन व्यवस्था न केल्याने, दुरुस्ती व देखभाल कार्यात विलंब होत आहे. तसेच, वाकवली, फणसू तसेच अन्य मार्गावरील वीज लाईनवर वारंवार होणाऱ्या बिघाडामुळे संपूर्ण पंचक्रोशीचा वीज पुरवठा बंद पडतो.

या संदर्भात पंचक्रोशी ग्रामस्थ सेवा समितीने महावितरण विभागाला निवेदन दिले असून यामध्ये जुन्या विजवाहिनी जीर्ण झाल्या असून त्यामुळे वित्त हानी सोबत जीवित हानी होण्याचा संभव अधिक आहे. देत तात्काळ स्थायी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच फणसू सब स्टेशन ते सडवे आणि फणसू ते वाकवली हे अंतर सुमारे 35 ते 36 की मी. चे असून मेंटेनन्स अथवा कोणताही फॉल्ट असेल तर लाईट येण्यास खूप कालावधी जातो. त्यामुळे या परिसरात स्वातंत्र्य फिडर तयार करण्याची मागणी ग्रामस्थानी केलेली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून साखळोली येथे दापोली मार्गे येणाऱ्या लाईन वर रिंग फिडींग तातडीने करून मिळावी म्हणजे वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करता येईल. त्याच बरोबर गावतळे परिसरात 11/33 केव्ही सब स्टेशन तयार करावे अश्या मागाण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

त्याचबरोबर गणेशोत्सव बरोबर नवरात्र उत्सव देखील येत असून या काळात लाईटचा खेळखंडोबा झाल्यास व नागरिकांच्या भावना तीव्र झाल्यास मोठे आंदोलन उभे राहण्याची परिस्तिथी निर्माण झाली असून तसें झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरणवर असेल असा तीव्र इशारा पंचक्रोशीच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी दापोली उपअभियंता निलेश बेंडाळे यांना याबाबत निवेदन देण्यात आले असून यावेळी शिवाजीनगर सरपंच शामल लांजेकर, सडवे सरपंच वसंत मेंगे, कोळबांद्रे सरपंच रघुनाथ गुरव, गाव अध्यक्ष संदीप कराडे, प्रकाश मेंगे, ग्रामस्थ अनंत पडवेकर, गणपत जामसूदकर, तुकाराम आईनकर, रामकृष्ण बर्वे, प्रमोद मळेकर, महेश लांजेकर, संतोष घरटकर, संदीप लांजेकर, आनंद करमरकर आदी प्रतिनिधी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:35 PM 15/Aug/2025