रत्नागिरी : आरवली (ता. संगमेश्वर) येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी यावर्षीचा स्वातंत्र्य दिन गावातील स्वातंत्र्यसैनिकाला मिळालेल्या ताम्रपटाच्या आठवणी जागवून आगळ्यावेगळ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य युद्धात सहभाग घेतलेली पिढी आता बहुतांश अस्ताला गेली आहे. पण त्यांना मिळालेले सन्मान पुढच्या अनेक पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. असाच एक ठेवा ताम्रपटाच्या स्वरूपात आरवली येथील सरदेशपांडे ऊर्फ कुलकर्णी घराण्यात अभिमानाने जपला जात आहे.
सदाशिव लक्ष्मण सरदेशपांडे ऊर्फ कुलकर्णी हे मूळचे लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली गावचे रहिवासी होते. पण त्यांच्या आधीच्या काही पिढ्या संगमेश्वर तालुक्यातील आरवली गावात स्थायिक झाल्या. सदाशिव सरदेशपांडे ऊर्फ कुलकर्णी यांनी देशसेवेचे व्रत घेतले होते. त्यासाठी ते आजन्म अविवाहित राहिले.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यासाठी वयाच्या जेमतेम चौदाव्या वर्षी त्यांनी आपले आरवली येथील घर सोडले. देशसेवा, सत्याग्रह, असहकार यांचा तो काळ होता. सदाशिव यांनीही त्यात उडी घेतली. गांधीजींच्या मिठाच्या सत्याग्रहात ते सामील झाले. दिल्लीच्या लाल किल्ल्यासमोर झालेल्या आंदोलनातही ते सहभागी झाले होते.
जालियनवाला बाग हत्याकांड घडले, तेव्हा ते पंजाब प्रांतातच होते. त्यामुळे त्यावेळची तेथलै परिस्थिती त्यांनी जवळून अनुभवली होती.
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावर ते आपल्या मूळ गावी आरवली येथे परत आले. त्यानंतर १९९३ साली त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे वास्तव्य आरवली येथेच होते. परत आल्यावर स्वातंत्र्य लढ्यातील आठवणी ते आवर्जून कुटुंबातल्या प्रत्येकाला सांगत असत. स्वातंत्र्यानंतरही पारतंत्र्यात केलेल्या त्यागाचे मोल त्यांना सतत होते. म्हणूनच शेवटपर्यंत स्वातंत्र्यदिनी, प्रजासत्ताक दिनी आणि महाराष्ट्र दिनी ते नियमितपणे ग्रामपंचायत कार्यालयात झेंडावंदनाला जात असत.
स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवाला १५ ऑगस्ट १९७२ रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर त्यांचा विशेष सत्कार तात्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना एक ताम्रपट सन्मानाने बहाल करण्यात आला होता. आजही तो ताम्रपट त्यांचे पुतणे आणि वहिनी प्रसाद गोविंद कुलकर्णी आणि अन्नपूर्णा गोविंद कुलकर्णी यांनी जतन केला आहे. त्यानंतर १९६७ साली मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते त्यांना मंत्रालयात सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. ते सन्मानपत्रही आरवलीच्या घरात कुलकर्णी कुटुंबीयांनी जपून ठेवले आहे. दरवर्षीच्या स्वातंत्र्यदिनी या ताम्रपटाच्या आठवणी जागविला जातात.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:22 16-08-2025













