खेड : महाड नाका परिसरातील शासकीय विश्रामगृहाचे लोकार्पण

खेड : खेड शहरातील महाड नाका परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे शासकीय विश्रामगृह १५ ऑगस्टच्या निमित्ताने पुन्हा एकदा जनतेसाठी खुले करण्यात आले. नुकत्याच पूर्ण झालेल्या नूतनीकरण व पुनर्बाधणीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

या विश्रामगृहाला राजकीय घडामोडींचे केंद्र मानले जात असून, पूर्वी येथे अनेक महत्वाचे लोकहिताचे निर्णय घेण्यात आले आहेत. लोकार्पण प्रसंगी बोलताना गृहराज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, लवकरच या इमारतीच्या वरच्या मजल्याचे उद्घाटनही करण्यात येईल. त्यांनी आठवण करून दिली की बालपणी आपल्या वडिलांबरोबर, माजी आमदार व मंत्री रामदास कदम यांच्यासह ते येथे येत असत आणि त्यावेळी या विश्रामगृहातून अनेक लोकहितकारी निर्णय घेतले गेले होते.

नव्या बांधकामात खोल्यांना दापोली मतदारसंघातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. या ठिकाणाहून पुन्हा जनहिताची कामे घडावीत, अशी अपेक्षा गृहराज्यमंत्री कदम यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी राहण्याची सुविधा नसत्यामुळे जी गैरसोय होत होती, ती आता या विश्रामगृहामुळे दूर झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या शेवटी कदम यांनी उपस्थित मान्यवरांसह खेडकरांना व राज्यातील जनतेला ७९ व्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शिवसेना उपनेते तथा माजी आमदार संजय कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी जि.प. सार्वजनिक बांधकाम सभापती अण्णा कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता आशा जटाळ, अभियंता निलेश पावसे, दीपक पवार, निलेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते.

खेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी उभे राहिलेले हे विश्रामगृह नवे रूप घेऊन जनतेसमोर आले असून, शहराच्या वैभवात निश्चितच भर घालेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 16/Aug/2025