‘रेड अलर्ट’मुळे चिपळुणात प्रशासन सतर्क

चिपळूण : हवामान विभागाकडून आलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्याला दिनांक रविवार दि. १७ व सोमवार दि. १८ या दोन दिवसांसाठी रेड अलर्ट दिला गेल्याने चिपळुणातील आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासन सतर्क झाले आहे. गेले काही दिवस चिपळूण शहर परिसरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. परिणामी, शिव आणि वाशिष्ठी नद्या दुथडी भरून प्रवाहित होत आहेत; मात्र प्रशासनाच्या सतर्कतेमुळे शहरात पूर येण्याचा धोका टळला आहे. मागील ४८ तासांत चिपळूण शहर परिसरासह नऊ मंडल विभागामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद शहराच्या पूर्व भागात सह्याद्री पट्ट्यातील कळकवणे येथे ३०० मि.मी. झाली. त्यामुळे रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले आहे.

चिपळुणातील प्रशासन दोन दिवसांच्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सतर्क झाले असून मागील सुमारे ४८ तासांमध्ये चिपळूण शहरासहीत नऊ मंडल विभागात पडलेल्या पावसाच्या आकडेवारीमुळे प्रशासनाकडून योग्य नियोजन केले गेले आहे. मागील दोन-तीन दिवसांत चिपळूण शहर परिसरात सुमारे ३४८ मि.मी. पावसाची नोंद झाली तर शहरानजिकच्या खेर्डी परिसरात ३४३ मि.मी. पावसाची नोंद झाली. सर्वाधिक जास्त पूर्व पट्ट्यात दोन दिवसांत ३९० मि.मी. पाऊस झाला तर शिरगाव मंडलात ३६० मि.मी. पावसाची नोंद झाली. शहराच्या दक्षिण व पश्चिम भागातील नऊ मंडलांमध्ये सावर्डे परिसरात अनुक्रमे १९८ मि.मी. व ११४ मि.मी., असुर्डे १७८ व १२३ मि.मी., बहाळ परिसरात १४० व १२० मि.मी., रामपूर मंडळ परिसरात १२२ व ११५ मि.मी., मार्गताम्हानेत १०८ व ११० मि.मी. अशी नोंद करण्यात आली. चिपळूण शहरात पावसाळी हंगामात पुराचे पाणी शिव आणि वाशिष्ठी नदी दुथडी भरून वाहिल्यावर शिरते.

प्रामुख्याने शहरातील पूर्व पट्टयात शिरगाव, कळकवणे, कुंभार्ली आदी ठिकाणच्या पावसाचे पाणी वाशिष्ठीच्या मध्यामातून थेट गोवळकोट खाडीपर्यंत जाते. दरम्यान, पावसाच्या वाढत्या प्रमाणामुळे हे पाणी पात्राबाहेर येऊन शहरात पूर येण्याच्या घटना घडत आहेत. तसेच शिव नदीचे पाणी देखील शहरात शिरते. एकूणच वाढत्या पावसामुळे नदीपात्र तुडुंब झाल्याने शहरात पूर परिस्थिती निर्माण होते. त्यातच कोळकेवाडी धरणातील पाणी वीजनिर्मितीनंतर वाशिष्ठी नदीपात्रात सोडले जाते. तसेच धरणाची सुरक्षितता धोक्यात येऊ नये म्हणून पाणी पातळी कमी केली जाते.

हे सर्व पाणी शहराकडे येऊन नागरी वस्तीत शिरते; मात्र २०२१ च्या महाप्रलयानंतर नदीतील गाळ काढण्याबरोबरच धरणातील पाण्याचे नियोजन झाल्याने गेल्या दोन-तीन दिवसांत पडलेल्या ३०० मि. मी. हून अधिक पावसामुळे नदीपात्रातील पाणी शहरात त्या प्रमाणात शिरले नाही. प्रशासनाने केलेले योग्य नियोजन व नद्यांमधील काढलेला गाळ याचे चांगले परिणाम झाल्यचाचे दिसून येत आहे. त्या दृष्टीने दोन दिवसांच्या रेड अलर्टमध्ये सतर्क झालेल्या प्रशासनाने पावसाचा जोर लक्षात घेता शहरात पूर परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियोजन सुरू केले आहे.

दरम्यान, मागील ४८ तासांत झालेल्या पावसामुळे शहरातील काही ठिकाणच्या सखल भागात पावसाचे पाणी तुंबले होते. वाशिष्ठी व शिव नदीपात्रापेक्षा कमी उंचीवर असलेल्या या भागातील पाणयाचा निचरा थांबला होता. अशा सखल भागातील पाण्याचा निचरा प्रामुख्याने नाले, पन्हे यांच्या माध्यमातून होतो. मात्र, दोन्ही नदीपात्रापेक्षा खोलगट असलेल्या अशा सखल भागातील पाणी पन्हे आणि नाले यांच्यातून नदीपात्रात प्रवाहित होण्यास थांबल्याने शहरातील असा काही सखल भाग पावसाच्या पाण्यात जाण्याच्या घटना काही काळ घडल्या. त्यामध्ये मुरादपूर गणपती मंदिर परिसर, अनंत आईस फॅक्टरी व लोटिस्मा वाचनालय परिसर, वाशिष्ठी नदीकिनाऱ्यानजिक नाईक कंपनी, भेंडीनाका परिसर येथे पाणी अडून राहिल्याने किरकोळ पूर परीस्थित निर्माण झाली होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 18/Aug/2025