रत्नागिरी, १८ ऑगस्ट २०२५:
रत्नागिरी शहरात सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने अखेर आपले रौद्र रूप दाखवले आहे. शहरातील कोकण नगर येथील नायाब रेसिडेन्सीजवळ आज सकाळी साडेसातच्या सुमारास एक संरक्षक भिंत कोसळल्याची मोठी घटना घडली. या दुर्घटनेत भिंतीखाली उभ्या असलेल्या तीन कारचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. सततच्या पावसामुळे नायाब रेसिडेन्सी इमारतीची संरक्षक भिंत खचली आणि थेट खाली उभ्या असलेल्या तीन कारवर कोसळली. यामध्ये या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.
सर्वात चिंतेची बाब म्हणजे, ही भिंत ज्या ठिकाणी कोसळली त्याच्या जवळच एक शाळा आहे. मात्र, ही घटना सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी घडल्याने मोठा अनर्थ टळला. शाळेच्या वेळेत किंवा विद्यार्थ्यांच्या वर्दळीच्या वेळी ही घटना घडली असती, तर मोठी जीवितहानी होण्याची भीती होती. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, शहरातील धोकादायक इमारती आणि जुन्या संरक्षक भिंतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 18-08-2025














