Ratnagiri : जिल्ह्यात पूरस्थिती, आंबा घाट बंद; त्यात आता मंत्रालयाकडून मुसळधार पावसाचा नवा अलर्ट!

रत्नागिरी, १८ ऑगस्ट:

रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या पावसाच्या धुमश्चक्रीने पूरस्थिती निर्माण झाली असताना आणि आंबा घाटात दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली असतानाच, आता थेट मंत्रालयातून धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील तीन तासांत रत्नागिरीसह, रायगड, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शासनाच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून, थेट मंत्रालय, मुंबई येथून नागरिकांच्या मोबाईलवर हा धोक्याचा इशारा पाठवण्यात येत आहे. जिल्ह्यात आधीच पावसाने कहर केला असून, या नव्या इशाऱ्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर

कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी, शास्त्री, कोदवली यांसारख्या प्रमुख नद्यांनी धोका आणि इशारा पातळी ओलांडली आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आज सकाळी साडेअकराच्या सुमारास रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात दरड कोसळल्याने हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. यामुळे घाटात दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

या सर्व गंभीर परिस्थितीत आता पुढचे तीन तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. प्रशासनाने नागरिकांना विनाकारण घराबाहेर न पडण्याचे, नदीकिनारी किंवा दरडग्रस्त भागांजवळ न जाण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:04 18-08-2025