रत्नागिरीत भाजपचा स्तुत्य उपक्रम: मुसळधार पावसात पत्रकारांचा सन्मान आणि नागरिकांना छत्र्यांचे वाटप

रत्नागिरी, १८ ऑगस्ट:

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकार बांधवांच्या कार्याचा गौरव आणि सामाजिक बांधिलकी जपण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर यांच्या वतीने रत्नागिरीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुसळधार पावसाची पर्वा न करता या कार्यक्रमात शहरातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला तसेच नागरिकांना छत्र्यांचे वाटपही करण्यात आले.

या उपक्रमाचा मूळ शुभारंभ भाजपचे प्रदेशाध्यक्ष, आमदार मा. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते डोंबिवली येथे झाला होता. त्याच धर्तीवर रत्नागिरीतही हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात आला. या उपक्रमाचे कौतुक करताना प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्र चव्हाण म्हणाले, “पत्रकार बांधवांचा सन्मान म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचा सन्मान आहे. डॉक्टर चंद्रशेखर निमकर यांचा हा उपक्रम समाजहितासाठी आदर्शवत ठरेल.”

रत्नागिरीत झालेल्या या कार्यक्रमाला भाजप प्रदेश सचिव सौ. शिल्पा मराठे, माजी नगराध्यक्ष उमेश कुळकर्णी, राजेश तोडणकर, माजी शहराध्यक्ष सचिन करमरकर, राजू भाटलेकर, माजी नगरसेविका सौ. पल्लवी पाटील यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे, शहरात मुसळधार पाऊस सुरू असतानाही पत्रकार बंधू-भगिनींनी या सन्मान सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली.

या कार्यक्रमांतर्गत, डॉ. निमकर यांच्या पुढाकारातून शहरातील विविध ठिकाणी नागरिकांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले. भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी नागरिकांना छत्र्या वितरित करून सामाजिक बांधिलकी जपली. या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थित नागरिकांनी डॉ. चंद्रशेखर निमकर आणि भारतीय जनता पक्षाचे मनःपूर्वक आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:35 18-08-2025