चिपळूण हादरले! कौटुंबिक वादातून भरधाव थारची रिक्षाला धडक, ५ ठार

चिपळूण, १९ ऑगस्ट : चिपळूण-कराड महामार्गावर वैशिष्टी डेरीजवळ पिंपळी कॅनॉल येथे काल रात्री १० ते ११ च्या सुमारास एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. कौटुंबिक वादातून भरधाव वेगात असलेल्या थार गाडीने एका रिक्षाला मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण तिहेरी अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रिक्षामधील चार प्रवासी आणि थार चालकाचा समावेश आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, हरियाणा पासिंगची एक थार गाडी भरधाव वेगाने कराडच्या दिशेने जात होती. पिंपळी कॅनॉलजवळ चालकाचे नियंत्रण सुटले आणि त्याने समोर असलेल्या प्रवाशी रिक्षाला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रिक्षा फरफटत जाऊन समोरून येणाऱ्या एका ट्रकवर आदळली. थार आणि ट्रकच्या मध्ये सापडल्याने रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या विचित्र अपघातात रिक्षामधील चार प्रवासी आणि थार चालकाचा जागीच मृत्यू झाला.

कौटुंबिक वादाची दुर्दैवी किनार या अपघातामागे कौटुंबिक वादाची एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. अपघातापूर्वी थार चालकाचे त्याच्या पत्नीसोबत चिपळूणमधील एका हॉटेलजवळ भांडण झाले होते. या भांडणानंतर रागाच्या भरात त्याने पत्नीला गाडीतून उतरवले आणि ताशी १२०-१३० किलोमीटरच्या वेगाने गाडी चालवत सुटला. याच वेगाच्या भरात हा भीषण अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

एकाच कुटुंबावर काळाचा घाला अपघातात मृत्यू पावलेले रिक्षामधील चारही जण पिंपळी येथील नुराणी मोहल्ल्यातील एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. यामध्ये दोन महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे पिंपळी गावावर शोककळा पसरली आहे.

वाहतूक विस्कळीत, पोलीस घटनास्थळी दाखल अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बेले, चिपळूण आणि शिरगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले. मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. चिपळूण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.