राजापूर जलमय! अर्जुना, कोदवली नद्यांना पूर; बाजारपेठेत शिरले पाणी, अनुस्कुरा घाटही बंद

राजापूर, १९ ऑगस्ट : गेले काही दिवस संततधारेने कोसळणाऱ्या पावसाने सोमवारी रात्रीपासून रौद्ररूप धारण केल्याने राजापूर शहराला आज (मंगळवार) पहाटे पुराचा वेढा पडला आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी थेट शहरातील बाजारपेठेत शिरले असून, संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच, सकाळी अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याने घाटमाथ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे, ज्यामुळे राजापूर तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने मंगळवारी पहाटे ६ वाजता पुराचे पाणी शहरातील मुख्य जवाहर चौकात पोहोचले. पाण्याची पातळी राधाकृष्ण कोल्ड्रिंक्सपर्यंत आल्याने व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची धावपळ उडाली. शहरातील भटाळी, गुजराळी, वरचीपेठ, शिवाजी पथ, चिंचबांध आणि आंबेवाडी यांसारखे अनेक भाग पाण्याखाली गेले असून शीळकडे जाणारा मार्गही बंद झाला आहे.

पुराचा धोका वाढल्याने बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी रात्रीपासूनच आपल्या दुकानांमधील माल सुरक्षित ठिकाणी हलवण्यास सुरुवात केली. सकाळी साडेआठ वाजता समुद्राला ओहोटी लागूनही पाण्याची पातळी वाढतच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांच्या मदतीसाठी माजी लोकप्रतिनिधी जमीर खलिफे आणि प्रशासकीय टीम कार्यरत आहेत.

एकीकडे शहरात पूरस्थिती गंभीर असताना, दुसरीकडे मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास राजापूरला घाटमाथ्याशी जोडणाऱ्या अनुस्कुरा घाटात दरड कोसळली. यामुळे घाटातील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. प्रशासनाने तातडीने घटनास्थळी यंत्रणा पाठवून दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

दरम्यान, हवामान खात्याने कोकणासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारी रात्रीच जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. सध्या प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.