संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी ते वाशी या मुख्य रस्त्याची अक्षरशः गटारासारखी अवस्था झाली असून, त्यावरून बस चालवणे अशक्य झाल्याने एसटी प्रशासनाने या मार्गावरील बसफेऱ्या अचानक रद्द केल्या आहेत. त्यामुळे वाशी गावातील आणि परिसरातील नागरिकांना पायपीट करावी लागत आहे.
बुरंबी ते वाशी रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, साचलेले पाणी, तसेच खराब जलनिःस्सारण व्यवस्थेमुळे प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या बससेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे, तर काहीजणांना प्रवास थांबवावा लागत आहे.
विशेष म्हणजे, लवकरच गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गावात जाणाऱ्या-येणाऱ्या नागरिकांची वर्दळ वाढणार आहे; मात्र अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतुकीची ही स्थिती नागरिकांसाठी अडचण निर्माण करणारी आहे. येथील स्थानिक नागरिकांच्या मते दरवर्षी पावसाळ्यात याच रस्त्याची अवस्था बिकट होते. प्रशासनाकडून तात्पुरती डागडुजी केली जाते; पण कायमस्वरूपी उपाय होत नाहीत, असे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले.
रस्ता तातडीने दुरुस्त करा
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. गणेशोत्सवातही अशीच स्थिती राहिली, तर ग्रामस्थांचीच नव्हे तर येणाऱ्या चाकरमान्यांचेही हाल होतील. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहावे, असेही ग्रामस्थांनी सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 19/Aug/2025












