रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी राजापूर-लांजा, दापोली, चिपळूण या तिन्ही विधानसभा जागा काँग्रेसला मिळाव्यात, अशी मागणी महाविकास आघाडीच्या जागावाटपात करण्यात येणार आहे. त्यामधील राजापूरच्या जागेवर काँग्रेस ठाम राहील, असे या बैठकीत सांगण्यात आले आहे. काँग्रेसची आढावा बैठक मीरा-भाईंदर येथे झाली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची कोकण विभागाची आढावा बैठक महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नाथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार, विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, गटनेते सतेज (बंटी) पाटील, कोकण प्रभारी बी. एम. संदीप, प्रदेश उपाध्यक्ष नाना गवांडे, भाई जगताप, हुसेन दलवाई आदी उपस्थित होते. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी जिल्ह्यातील काँग्रेसची राजकीय परिस्थिती सर्वांपुढे मांडली. आगामी विधानसभा निवडणुकीत संभाव्य कोणत्या जागा काँग्रेस लढवणार आणि कोणत्या जागेबाबत आग्रही राहणार याचा जिल्हानिहाय आढावा बैठकीत घेण्यात आला. ते म्हणाले, जिल्ह्यात काँग्रेसची परंपरागत मते आहेत. लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय दोन्ही मतदार संघात आला आहे. महायुतीच्या उमेदवारांना जास्तीत जास्त मते मिळवून देण्याचा प्रयत्न होता. राजापूर विधानसभा मतदार संघात चांगले काम केले होते. सध्या या मतदार संघात स्थानिक उमेदवार मिळावा, अशी मागणी केली जात आहे. स्थानिक आमदारांविषयी मतदारांमध्ये चांगले मत नाही. त्याचा फायदा निश्चितच काँग्रेसला होऊ शकतो. त्याचबरोबर दापोली आणि चिपळूण या विधानसभा मतदार संघातही पक्षाची स्थिती चांगली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील या तीन जागा आपण लढवू शकतो. महाविकास आघाडी असल्यामुळे जागा वाटप करताना राजापूरच्या जागेवर ठाम राहिले पाहिजे, असे लाड यांनी बैठकीत सांगितले.
महाविकास आघाडीत त्रांगडे
रत्नागिरी जिल्ह्यात पाच विधानसभेच्या जागा आहेत. त्यातील महाविकास आघाडीतील ठाकरे सेनेचे आमदार गुहागर आणि राजापुरात आहेत. उर्वरित तीनपैकी दापोली-खेड-मंडणगड व रत्नागिरी या जागा ठाकरे गटाकडे आहेत. चिपळूण-संगमेश्वरची जागा शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता आहे. ठाकरे सेनेचे आमदार असलेल्या राजापूरच्या जागेवर काँग्रेसकडून दावा केल्यामुळे महाविकास आघाडीत या जागेवरून त्रांगडे निर्माण होण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 21-09-2024