रत्नागिरी : अखेर राजिवडा खाडीतील गाळ काढण्यास आणि खाडीच्या मुखाशी ब्रेकवॉटर वॉल (ग्रोयान्स टाईप) बंधारा बांधण्याच्या कामास प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. सुमारे १४३ कोटी ९६ लाख रुपयांच्या कामाचे अंदाजपत्रक आहे. पुढील तीन वर्षांमध्ये टप्प्याटप्प्याने अर्थसंकल्पात यासाठी तरतूद करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५० कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे राजीवडा येथील मच्छीमारांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होणार असून, नौका ये-जा करण्यासाठी जलमार्ग होणार आहे. पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले.
महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने ३१ जुलै, २०२५ ला हा शासननिर्णय जारी केला आहे. या कामामध्ये खाडी मुखाजवळ ब्रेकवॉटर वॉल ग्रोयान्स टाईप बंधारा बांधणे व खाडीमुखाजवळ गाळ काढणे हा आहे. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने २०२२-२३ च्या राज्यदरसूचीवर आधारित अंदाजपत्रक तयार केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने या अंदाजपत्रकाची तपासणी केली आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च १४३.९७ कोटींइतका आहे. ‘ब्रेकवॉटर’ बंधाऱ्याच्या कामासाठी ६४ कोटी २५ लाख ५ हजार ३१५ खर्च अपेक्षित आहे. गाळ काढण्यासाठी ३७ कोटी ५ लाख ४५ हजार ९३८ खर्च अपेक्षित आहे.
या व्यतिरिक्त, रॉयल्टी (रु. ४,५६,३८,४८४), प्रयोगशाळा चाचणी शुल्क (रु. ९,८६, २८०) तसेच विविध प्रकारचे अतिरिक्त शुल्क जसे की, आकस्मिक निधी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC), जीएसटी (रु. १८,२६,५४,५५५), आणि विमा शुल्क यांचा समावेश आहे. या कामाची सुरुवात २०२५-२६ या आर्थिक वर्षापासून होत आहे. या प्रकल्पासाठी वर्षनिहाय खर्चाचे नियोजन केले आहे. त्यामध्ये आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५० कोटी, २०२५-२६ मध्ये ६३ कोटी ९ लाख, २०२६-२७ मध्ये ८० कोटी ३८ लाख खर्चाची तरतूद केली आहे.
मच्छीमारांचे स्वप्न होणार पूर्ण
राजिवडा खाडीतील गाळ काढण्यास व खाडीच्या मुखाशी ब्रेकवॉटर बॉल बांधारा बांधण्याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे येथील मच्छीमारांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न पूर्ण होणार असून, नौका ये-जा करण्यासाठी जलमार्ग होणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:27 PM 19/Aug/2025












