कोकणातील ‘त्या’ तीन याचिका कोल्हापूर सर्किट बेंचकडे वर्ग

चिपळूण : मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर फिरत्या खंडपीठाचे (सर्किट बेंच) कामकाज सोमवारपासून सुरू झाले. निवडणुकीच्या संदर्भातील कोकणातील तीन याचिका या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाची २०२४ मध्ये निवडणूक झाली. भाजपकडून नारायण राणे, तर शिवसेनेकडून विनायक राऊत यांनी ही निवडणूक लढवली. निवडणूक प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरसुद्धा राणे यांचे कार्यकर्ते मतदारांना पैसे वाटत होते. राणे यांच्या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत होते. मतदारांना धमकावत होते. या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माजी खासदार राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात खासदार राणे यांच्या विरोधात याचिका दाखल केली आहे.

२०२५ मध्ये चिपळूण मतदार संघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत झाली. यामध्ये आमदार शेखर निकम यांनी ग्रामपंचायतींना संगणक वाटले, मानहानीकारक भाषण केले असे अनेक मुद्दे यात नमूद करण्यात आले. प्रशांत यादव यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेला खटला कोल्हापूरच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला आहे.

रत्नागिरी विधानसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार ज्योतिप्रभा पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याविरोधी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका कोल्हापूरच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. उच्च न्यायालयात १७५० पानांची याचिका पाटील यांनी दाखल केली आहे. विजयी उमेदवार उदय सामंत यांची निवड रद्द करावी आणि त्यांना सहा वर्षांसाठी अपात्र ठरवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 20/Aug/2025