रत्नागिरी : शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी नवीन पोर्टल सुरू

रत्नागिरी : जनसमर्थ केसीसी पोर्टलद्वारे किसान क्रेडीट कार्ड, पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी नवीन पोर्टलची सुरूवात केली आहे.या पोर्टलमध्ये अॅग्रीस्टॅक डेटा प्रणालीच्या पोर्टलची एकात्मिकरण केले असून पात्र शेतकऱ्यांना पारदर्शक सुलभ व कागद विरहित पध्दतीने पीक कर्ज मंजुरी करता येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी पत्रकाद्वारे दिली.

या पोर्टलद्वारे रत्नागिरी जिल्ह्यातील अकरा बँकाद्वारे शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. या उपक्रमांतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र व सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँका जनसमर्थ पोर्टलवर यशस्वीपणे ऑन बोर्ड केले आहेत व पीक कर्ज मंजुरीची प्रणाली कार्यान्वित केली असून शेतकऱ्यांना कोणत्याही भौतिक कागदपत्रांशिवाय ऑनलाइन प्रणालीद्वारे तातडीने कर्ज मंजुरी होणे शक्य आहे. पीक कर्जासाठी काही निकष असून शेतकऱ्यांनी केसीसी अर्ज करताना काही अटी घातल्या आहेत.

आधार क्रमांक सक्रिय मोबाईल नंबरशी संलग्न असावा, पत्रासोबत जोडलेल्या बँकापैकी कोणत्याही सहभागी बँकेत खाते असावे, शेतकरी अॅग्रीस्टॅक रजिस्ट्रीमध्ये नोंदणीकृत असावा व त्यास मंजुरी प्राप्त झालेली असावी, सद्यस्थितीत जमिनीची वैयक्तिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीच ही सुविधा सुरू केलेली आहे. केवळ वैयक्तिक मालकी असलेल्या शेतकऱ्यांची या मोहिमेकरीता निवड करण्यात यावी. त्याशिवाय पीक कर्ज मंजुरीसाठी प्रत्येक बँकेचे इतर स्वतंत्र पात्रता निकष असू शकतात. तसेच इच्छुक व पात्र शेतकऱ्यांनी कृषी विभागास संपर्क साधावा किंवा सीएससी धारकांकडून अर्ज करावा किंवा निवडलेल्या बँकेस संपर्क साधावा, तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी अधिकारी सदाफुले यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:30 AM 21/Aug/2025