रत्नागिरी : नावावर दोन मतदान कार्ड असेल तर होईल कारवाई

रत्नागिरी : महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. मात्र, अनेक मतदारांकडे दोन मतदान ओळखपत्र असतात, जे कायद्याचे उल्लंघन आहे. यामुळे मतदारावर गुन्हा दाखल होऊन तुरुंगवास, दंडासह मतदानाचाही अधिकार काढून घेतला जाऊ शकतो.

भारतीय संविधानाने प्रत्येकालाच मतदानाचा हक्क बहाल केला आहे. मात्र, एकाच व्यक्तीला दोन मते देता येत नाहीत. तसेच एकाच व्यक्तीने दोन मतदान कार्ड काढणे, हा गुन्हा आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५० नुसार कोणतीही व्यक्ती एकाहून अधिक मतदारसंघात मतदान करू शकत नाही किंवा एकापेक्षा जास्त मतदारसंघांमध्ये मतदार यादीत नाव समाविष्ट करता येत नाही.

एखाद्या व्यक्तीने फसवणूक करून मतदार यादीत आपले नाव दोनदा नोंदवले असेल. त्याच्याकडे दोन मतदार (EPIC) कार्ड असतील तर ते कायद्याच्या कलम ३१ चे उल्लंघन आहे. हा अदखलपात्र गुन्हा आहे. त्याबद्दल एक वर्ष कारावास किंवा दंडाची रक्कम किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.

दोन मतदान कार्ड असल्यास काय कराल?
निवडणूक आयोगाने रंगीत मतदान कार्ड दिली आहेत. त्यामुळे काहींकडे ब्लॅक अँड व्हाइट असे मतदार कार्ड राहिलेले असल्यास त्यांना ते तहसील कार्यालयात किंवा बीएलओंकडे ७ क्रमांकाचा फॉर्म भरून एक कार्ड जमा करण्याचे आयोगाकडून निर्देश दिले आहेत.

ऑनलाइन व अॅपवरही नाव वगळण्याची सुविधा
निवडणूक आयोगाने मतदारांना घरबसल्या सुविधा दिल्या आहेत. त्यामुळे ऑनलाइन किंवा व्होटर अॅपवरही नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

मतदानाचा अधिकारही गमावून बसाल
दोन मतदार कार्ड असतील तर तो दंडनीय गुन्हा ठरतो. अशा व्यक्ती मतदानाचा हक्कही गमावून बसतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:17 PM 21/Aug/2025