रत्नागिरी : दापोली तालुक्यातील मौजे आंजर्ले आणि मंडणगड तालुक्यातील मौजे वेळास येथील समुद्रकिनाऱ्यांना जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जैवविविधता ही पर्यावरणीय सुरक्षा व मानवी कल्याणाशी निगडित आहे. वारसा स्थळ घोषित केल्यास जलदरितीने जैवविविधतेचा हास रोखण्यास मदत होईल. या दोन्ही ठिकाणी दरवर्षी ऑलिव्ह रिडले कासवांचे आगमन होते. त्यांच्या अंडी घालण्याच्या काळात स्थानिक स्वयंसेवक आणि पर्यावरणप्रेमी मोठ्या प्रमाणावर संरक्षण कार्यात सहभागी होतात. वेळास येथे कासव महोत्सव देखील आयोजित केला जातो, जो पर्यावरणीय पर्यटनाला चालना देतो.
विभागीय वन अधिकारी (चिपळूण) यांनी या ठिकाणच्या जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करत सादरीकरण केले. प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर ना-हरकत प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही समितीच्या मंजुरीने तातडीने केली जाईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे स्थानिक ग्रामस्थांना पर्यावरण संवर्धनात अधिक सक्रिय सहभाग घेता येईल. पर्यटन वाढल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि जैवविविधतेचे संरक्षणही सुनिश्चित होईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:05 AM 22/Aug/2025














