रत्नागिरी : गेले सहा-सात दिवस सुरू असलेल्या पावसाने उसंत घेतल्यानंतर गुरुवारी रत्नागिरीकरांना सूर्यदर्शन झाले. खेडमध्ये सह्याद्रीच्या पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत गेली. बुधवारी दिवसभरात ३०३.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे.
गुरुवारी चार-पाच दिवसाच्या विश्रांतीनंतर मच्छीमारांनी खवळलेल्या समुद्रात मासेमारीसाठी नौका पाठवल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत अद्यापही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राला पावसाने झोडपून काढले होते. गेले सहा-सात दिवस पावसाने जिल्ह्यात कहर केला होता. सहा-सात नद्याही इशारा पातळीच्यावरती वाहत होत्या. खेड, चिपळूण, संगमेश्वरचा ग्रामीण भाग, राजापूर भागाला पुराचा तडाखा बसला होता. बुधवारपासूनच पावसाचा जोर कमी झाला होता. गुरुवारी दिवसभर पावसाच्या किरकोळ सरी कोसळल्या.
मंडणगड २८.७५ मिमी, खेड ३५.७१ मिमी, दापोली २३.२८ मिमी, चिपळूण ५८.५६ मिमी, गुहागर २४.६० मिमी, रत्नागिरी १९.७७मिमी, लांजा ३४.४० मिमी, राजापूर ६१ मिमी असा जिल्ह्यात ३०३.९० मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील पाच ते सहा दिवसात जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. चिपळूण, खेर्डी, संगमेश्वरमधील माखजन, संगमेश्वर या भागात व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. पावसाने उसंत घेतल्यामुळे व वाऱ्याचा वेग कमी झाल्यामुळे बुधवारी सायंकाळनंतर व गुरुवारी पहाटे मच्छीमारांनी आपल्या नौका समुद्रात पाठवल्या होत्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 22-08-2025













