हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे रक्तक्षय घटेल : सीईओ वैदेही रानडे

रत्नागिरी : प्रत्येकाने आपल्या परसबागेतून लोहयुक्त हिरव्या भाज्यांचा समावेश आहारात केला तर रक्त क्षयाचे प्रमाण कमी होईल. हा प्रकल्प आपल्या मनातील आहे, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील महिला अन् बालकांमध्ये वाढत्या रक्तक्षयाच्या समस्येवर मात करण्यासाठी तालुकास्तरीय अॅनिमिया नियंत्रण प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.
या उपक्रमाचे आयोजन श्रीमद राजचंद्र हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर धरमपूर, जि. वलसाड (गुजरात) आणि स्वयंपूर्तता फाऊंडेशन रत्नागिरी यांच्यावतीने, जिल्हा परिषद व आरोग्य विभाग रत्नागिरी यांच्या सहकायनि करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, प्रोग्राम डायरेक्टर विरेन गांधी, स्वयंपूर्तता फाऊंडेशन अध्यक्षा दीपिका रांबाडे, स्वयंपूर्तता फाऊंडेशन सचिव युयुत्सु आर्ते उपस्थित होते.

जिल्ह्यात महिलांचे रक्तक्षयाचे प्रमाण जास्त असून, या प्रकल्पामुळे महिलांना आणि मुलांना मोठा फायदा होईल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी सांगितले.

प्रकल्पाची उद्दिष्टे : महिलांमधील व बालकांमधील अॅनिमिया कमी करण्यासाठी जनजागृती करणे. आरोग्य तपासणी, लोहयुक्त आहाराबाबत मार्गदर्शन आणि औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देणे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 22/Aug/2025