खेड : पावसातच जगबुडी पुलाची डागडुजी!

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील भरणे-जगबुडी पुलावरून मोटार नदीपात्रात कोसळून सहा जणांचा हकनाक बळी गेला होता. त्यानंतरही कोणतीही कार्यवाही न करणाऱ्या प्रशासनाला पुलावरील खड्डेमय मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी पावसाळ्यात सवड मिळाली. जगबुडी पुलावर डागडुजीचे काम हाती घेण्यात आले.

भर पावसात संरक्षक भिंतीला रंगरंगोटीचे काम सुरू करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या तोंडावरच प्रशासनाला सवड मिळाल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. भरणे जगबुडी पूल अपघातांच्यादृष्टीने ‘संवेदनशील’ बनला आहे. प्रवाशांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागत आहे. गतमहिन्यातील भीषण दुर्घटनेनंतर तकलादू उपाययोजना करत मलमपट्टी करणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग खात्यावर टीकेची झोड उठली होती. अपघात ‘स्पॉट’वर केवळ संरक्षक भिंत उभारण्यापलीकडे काहीच करण्यात न आल्यामुळे अपघातांची टांगती तलवार कायम होती.

२७ पासून कोकणात गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. यामुळे महामार्गावर चाकरमान्यांची संख्या वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर जागे झालेल्या प्रशासनाने बुधवारी सायंकाळच्या सुमारास डागडुजी सुरू केली; मात्र डागडुजीचे काम भरपावसात कितपत तग धरेल, असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 22/Aug/2025