रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षांसाठी खासगी विद्यार्थी (फॉर्म नं. १७) योजनेंतर्गत १ ऑगस्टपासून ऑनलाईन नावनोंदणी सुरू केली आहे. शिक्षण अर्धवट राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी या योजनेत चालूवर्षी ३१ ऑगस्ट अखेर पर्यंत प्रत्येक शाळेत ५० विद्यार्थी संख्येच्या मर्यादित नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती कोकण विभागीय मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.
विभागीय अध्यक्ष क्षीरसागर यांनी सांगितले की, ही योजना नियमित शिक्षणापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे उघडणारी आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६च् या परीक्षांसाठी नोंदणी १ ऑगस्टपासून सुरू झाली असून, नोंदणीची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. या योजनेमुळे आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा इतर कारणांमुळे शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळणार आहे. नावनोंदणीनंतर पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
पात्रता निकष-दहावीसाठी विद्यार्थ्याना किमान ५वी उत्तीर्ण केलेली असावी आणि ३१ जुलै २०२५ रोजी वय १४ वर्षे पूर्ण असावे. परराज्यातील किंवा परदेशातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्यातील दोन वर्षांचे रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
बारावीसाठी दहावी परीक्षा किमान दोन वर्षांपूर्वी उत्तीर्ण असावी. विज्ञान शाखेसाठी दहावीत विज्ञान विषयात किमान ३५ टक्के गुण व इंग्रजी विषय अनिवार्य आहे. परराज्यातील विद्यार्थ्यांसाठी योग्यता प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मान्यताप्राप्त शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात विद्यमान विद्यार्थी नसावा. नोंदणीसाठी अर्ज http://www.mahahsscb oard.in संकेतस्थळावर Student Corner या टॅबमध्ये फॉर्म नं. १७ विभागात उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी अर्ज डाऊनलोड करून आवश्यक तपशील भरावेत आणि संबंधित कागदपत्रांसह शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:20 AM 22/Aug/2025













