रत्नागिरी : महाराष्ट्रातील २०० गडकिल्ल्यांची भटकंती पूर्ण केल्यानंतर येणाऱ्या काळात प्रचितगड पायथा गावे, पंचक्रोशीतील गावांना दुर्गसंवर्धन ओळख पोचावी यासाठी येत्या २८ ऑगस्टपासून जनजागृती मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती संगमरत्न फाउंडेशनचे कळंबस्ते मलदेवाडी (ता. संगमेश्वर) येथील तरुण गिर्यारोहक अल्पेश सोलकर यांनी दिली.
अल्पेशने या आधी गडकिल्ले भटकंती करताना एक-दोनदिवसीय तसेच तीन दिवसीय भटकंती मोहीम केलेली आहे. त्यामध्ये जसे धुळे, जळगावमधील किल्ले लळिंग, भामेर, चौगाव, पारोळा, पुणे मल्हारगड, ढवळगड, वाफगाव, इंदुरी, चाकण किल्ला, सांगली सदाशिवगड, विलासगड, मच्छिंद्रगड, बानूरगड किल्ले अशा महाराष्ट्रातील दोनशे किल्ल्यांची भटकंती केली आहे. भटकंती करत असताना तेथील माहिती घेऊन त्याचा गडकिल्ले संवर्धनमध्येही पुढाकार असतो.
आताच्या तरुण पिढीने गडकिल्ले संवर्धन करावे, आपला इतिहास जपावा, या उद्देशाने संगमेश्वर तालुक्यातील अल्पेशने किल्ले प्रचितगडाचे संवर्धनाचे काम हाती घेतले. या कामाच्या दोन मोहिमासुद्धा झाल्या आहेत. पहिल्या मोहिमेत गडाचा मुख्य दरवाजा मोकळा करण्यात आला होता. तसेच दुसऱ्या मोहिमेत बुरुज, गडावरील मंदिर परिसर, पाणी टाके इत्यादी गोष्टी साफसफाई गिर्यारोहक आणि स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी यांच्या सहकायनि त्याने पूर्ण केली आहे.
अल्पेशने संगमरत्न फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून तरुण वयातील समाजसेवेची आवड जोपासली. संस्थेमार्फत शैक्षणिक विभागअंतर्गत विविध शाळांमध्ये शालेय वस्तूंचे वाटप, तालुकास्तरीय स्पर्धा, रक्तदान शिबिर आणि वृक्षारोपण उपक्रम राबवला आहे.
गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळे जपा..
गडकिल्ले, ऐतिहासिक स्थळे भटकंतीसोबत ती अभ्यासलीसुद्धा पाहिजेत. ऐतिहासिक घाटवाटा, स्थळे, समाधीस्थळे, मंदिरे, लेणी, किल्ले यांच्या अभ्यासमोहिमा घडवण्याचा मानस संगमरत्न फाउंडेशनचा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 22/Aug/2025













