Khed : खेडमध्ये रिक्षाप्रवासात महिलेचे सव्वा लाखांचे दागिने लंपास; सहप्रवासी महिलेची हातचलाखी

खेड: रेल्वे स्टेशनवरून बस स्टँडकडे रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्समधून, तिच्या शेजारी बसलेल्या अज्ञात महिलेने हातचलाखीने १ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना खेडमध्ये घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी आनंदी अभिषेक देवघरकर (वय २८, रा. दिवा, मूळ रा. दापोली) यांनी खेड पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आनंदी देवघरकर या दिनांक २४ ऑगस्ट २०२५ रोजी दिवा-सावंतवाडी रेल्वेने प्रवास करून दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्टेशनवर उतरल्या. तेथून त्या बस स्टँडकडे जाण्यासाठी एका रिक्षात बसल्या.

यावेळी त्यांच्या शेजारी एक अज्ञात महिला प्रवासी म्हणून बसली होती. याच प्रवासादरम्यान, त्या अज्ञात महिलेने आनंदी देवघरकर यांची नजर चुकवून त्यांच्या पर्सची चेन उघडली आणि आतील सोन्याचे दागिने अत्यंत शिताफीने काढून घेतले. रिक्षातून उतरल्यावर काही वेळाने हा प्रकार त्यांच्या लक्षात आला, मात्र तोपर्यंत ती अज्ञात महिला पसार झाली होती.

या चोरीत त्यांचे खालील दागिने चोरीला गेले:

मंगळसूत्र: १९ ग्रॅम ८९० मिली वजनाचे (किंमत ८७,००० रुपये)

कानातले: ७ ग्रॅम ८०० मिली वजनाचे (किंमत २०,००० रुपये)

नाकातील नथ: (किंमत ३,२०० रुपये)

एकूण १ लाख १० हजार २०० रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. या घटनेनंतर आनंदी देवघरकर यांनी २५ ऑगस्ट रोजी खेड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा (गु.र.नं. २६५/२०२५) दाखल केला असून, पोलीस त्या सहप्रवासी महिलेचा शोध घेत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 26-08-2025