जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विमानसेवा सुरू होण्याची शक्यता, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली विविध विकासकामांची माहिती
रत्नागिरी: कोकणात सद्यस्थितीत दुष्काळाची परिस्थिती असून नुकसान भरपाई पंचनामे करण्यात आले आहेत आणि शासनाकडून मदत देण्याचे काम सुरू आहे. अशातच आता रत्नागिरीवासीयांसाठी पालकमंत्री तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पर्यटन उद्योग व नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. कोकणात लवकरच विमानसेवा सुरू होईल व दोन फाईव्ह स्टार हॉटेल इंडस्ट्रीजच्या माध्यमातून तब्बल ६०० ते ७०० जणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. १२ नोव्हेंबर रोजी गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
रत्नागिरी येथे दोन फाईव्ह स्टार हॉटेल उभी राहत असून, एक एक्सप्रेस इन व दुसरे महिंद्रा क्लब ही दोन्ही हॉटेल मिळून मोठ्या प्रमाणात ६०० ते ७०० जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहेत. या दोन्ही फाईव्ह स्टार हॉटेल्सना टाटाच्या स्किल सेंटरशी टायअप करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या स्किल सेंटरमधून विविध कोर्स करून बाहेर पडलेल्या मुलांना या हॉटेलमध्ये रोजगाराच्या संधी देण्याचा निर्णय दोन्ही हॉटेल व्यवस्थापनाने घेतला आहे. रत्नागिरीची विमानतळ सेवा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता असून, आपली टर्मिनल बिल्डिंगही सज्ज झाली आहे, अशी मोठी घोषणा त्यांनी यावेळी केली. या पत्रकार परिषदेत रत्नसिंधू योजनेचे उपाध्यक्ष डॉ. विनय नातू आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदाल उपस्थित होते.
विमानतळ विकास आणि इतर महत्त्वाचे निर्णय
सिंधुदुर्गची चिपी विमानतळ टर्मिनल बिल्डिंग आठ वर्षांपूर्वी पूर्ण झाली होती, तर आपण रत्नागिरी विमानतळ टर्मिनल बिल्डिंग दोन वर्षात पूर्ण केली, असे सांगत सामंत यांनी दोन्ही विमानतळांमधील फरक स्पष्ट केला. चिपी विमानतळाच्या तुलनेत रत्नागिरीचे एअरपोर्ट हे कलेक्टर ऑफिसपासून केवळ दोन किलोमीटर अंतरावर आहे. ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्याप्रमाणे रत्नागिरीत १५ जणांची आरडीआरएफ (RDRF) आपत्कालीन टीम तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महिंद्रा क्लब या फाईव्ह स्टार हॉटेलचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून दुसरे चंपक मैदानावर एक्सप्रेस इन हॉटेल उभे राहत आहे. जिल्ह्यातील एकही डायलिसिस सेंटर बंद होऊ देणार नाही, अशी ग्वाही देत त्यांनी पाचही डायलिसिस सेंटरना तांत्रिक कर्मचारी असून जर संबंधित एजन्सीला ते झेपले नाही, तर जिल्हा प्रशासनाकडून ही सेंटर चालवली जातील असे स्पष्ट केले. तसेच पुढील महिन्यात आरोग्यमंत्र्यांच्या जिल्हा दौऱ्यातून आणखी काही सुविधा जिल्ह्याला मिळतील अशी माहिती त्यांनी दिली.
मदत करणारा जिल्हा आणि इतर घडामोडी
रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रामध्ये मदत करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो. गुरांसाठी लागणारा चारा जिल्ह्यासाठी तयार केला जात असून अन्य जिल्ह्यांसाठी लागणारा चाराही तयार केला जात आहे. मायक्रो फायनान्स हा सावकारीसारखा प्रकार असून महिला बचतगटांना नॅशनलाइज्ड बँक कर्ज देत नसल्याच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी सोमवारी बैठक घेणार आहेत, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, आगीच्या भक्षस्थानी पडलेल्या श्री महालक्ष्मी मॉल व अन्य दोन व्यापाऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून पालकमंत्र्यांनी व्यापारांना दिलासा दिला. श्री महालक्ष्मी मॉलचे मयूर खानविलकर येत्या दोन-चार दिवसांत पुन्हा काऊंटरवर सज्ज झालेले दिसतील यासाठी काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासन व स्थानिक व्यापाऱ्यांना दिल्या आहेत.













