Mumbai goa highway : महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी ‘स्टिल स्लॅग’ तंत्रज्ञान

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी दहा लाख प्रवासी कोकणात येण्याच्या शक्यतेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील दुरुस्तीचे काम जलदगतीने सुरू आहे. गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये करण्यात येणाऱ्या स्टिल स्लॅग तंत्रज्ञानाचा वापर करून महामार्गावरील खड्डे भरण्यात येत आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. पावसामुळे दुरुस्तीच्या कामात अडथळा येत होता, तरी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुमारे ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित ठिकाणी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरू आहे, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीदरम्यान महामार्गाच्या आढाव्यामध्ये त्यांनी हे स्पष्ट केले. मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, महामार्गाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. खड्डे आणि सुरू असलेले काम यामुळे महामार्गावर यंदाही कोंडी होण्याची दाट शक्यता आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पडणाऱ्या खड्ड्यांसंदर्भात सातत्याने ओरड होत आहे. याचाच परिणाम म्हणून या महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्यावर भर आहे. कोकणात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे दुरुस्तीचे कामे वेगाने पूर्ण करणे शक्य होत नव्हते. पावसाचा अडथळा आला नसता तर आतापर्यंत दुरुस्तीचे ९० टक्के काम पूर्ण केले असते, असेही त्यांनी सांगितले.

महामार्गाची रस्ते दुरुस्तीसाठी ‘स्टिल स्लॅग’ या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. स्टिलनिर्मिती करत असताना निर्माण केले जाणारे हे बायप्रॉडक्ट असल्याचे पीडब्लूडीच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. गुजरात आणि आंध्र प्रदेशमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर यशस्वीरीत्या करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.

याला म्हणतात स्टील स्लॅग
स्टिल स्लॅग हे पोलाद निर्मिती प्रक्रियेतून मिळणारे एक उपउत्पादन आहे, जे वितळलेल्या स्टीलपासून अशुद्धी आणि सिलिकेटस् वेगळे करताना तयार होते. हे मूलतः धातूंचे ऑक्साईड आणि सिलिकाचे मिश्रण असते, जे थंड झाल्यावर घट्ट होते आणि बांधकाम उद्योगात, विशेषतः डांबरीकरण व काँक्रिटमध्ये, नैसर्गिक समुच्चयांना पर्याय म्हणून वापरले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:57 PM 26/Aug/2025