SPREE Yojana : कर्मचारी राज्य विमा महामंडळाची स्प्री योजना जाहीर

रत्नागिरी : कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) स्प्री (SPREE) ही योजना जाहीर केली आहे. ही योजना १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांमध्ये लागू होणार आहे. जिल्ह्यातील अशा आस्थापनांमधील लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत विविध लाभांचा फायदा मिळणार आहे.

१ जुलैपासून सुरू करण्यात आलेली ही योजना ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहणार आहे. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने स्प्री योजनेद्वारे, अशा आस्थापनांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना नोकरीची सुरक्षा म्हणून आरोग्य आणि सामाजिक सुरक्षा लाभांची हमी दिली आहे. सुलभ नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक असल्याने सोपी झाली आहे. पूर्वीच्या दायित्वांमधून सूट मिळाल्याने आस्थापनांना नोंदणी करणे सोपे होणार आहे. नोंदणी करताना तपासणी आणि पूर्वीच्या सर्व दायित्वांमधून सूट दिली आहे. यामुळे आस्थापनांना कोणतीही भीती न बाळगता नोंदणी करता येणार आहे. यामुळे लाखो कामगारांना ईएसआयसीच्या आरोग्य, सुविधा, आजारपण लाभ, अपंगत्व लाभ आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेता येणार आहे.

ही योजना रस्ता वाहतूक, हॉटेल्स, रेस्टॉरंट, सिनेमागृह, वृत्तपत्रे, दुकाने, शैक्षणिक, वैद्यकीय संस्था, आदींमध्ये दर महिन्याला २१,००० रुपयांपर्यंत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत विविध लाभ मिळणार आहेत. ही योजना ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब…’ या तत्त्वावर आधारित असून, आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांची नोंदणी करून त्यांना हे लाभ मिळवून द्यावेत, असे आवाहन कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) ने केले आहे. अधिक माहितीसाठी, आस्थापनांनी ईएसआयसीच्या www.esic.gov.in या अधिकृत वेबसाइटवर माहिती घ्यावी किंवा १८००-११-२५२६ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:23 PM 26/Aug/2025