Ratnagiri News : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा ‘ड्रग्ज’वर मोठा छापा; रत्नागिरी आठवडा बाजारातून ४ किलो गांजासह तरुण अटकेत

Ratnagiri News रत्नागिरी: जिल्ह्यात अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र करत रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने Local Crime Branch (LCB) एक मोठी कारवाई केली आहे. रत्नागिरीतील आठवडा बाजाराच्या परिसरातून एका तरुणाला ४ किलो गांजासह अटक करण्यात आली आहे. नंदादीप नामदेव वाघदरे (वय २९, रा. लांजा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून एकूण २ लाख ४० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांनी जिल्ह्यात अमली पदार्थांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार, पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली Local Crime Branch (LCB) पथक मंगळवारी (दि. २६ ऑगस्ट २०२५) रत्नागिरी शहर आणि ग्रामीण हद्दीत गस्त घालत होते.

खेडशी, रेल्वे स्टेशन, कुवारबाव, नाचणे, मारुती मंदिर अशा विविध ठिकाणी गस्त घालत असताना पथक आठवडा बाजारात पोहोचले. बाजारातील गाळ्यांच्या मागे असलेल्या मोकळ्या मैदानावरील एका अर्धवट शेडमध्ये एक तरुण पाठीला सॅक लावून संशयास्पदरीत्या हालचाली करताना पोलिसांना दिसला. पथकाने त्याला थांबवून चौकशी केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला.

पोलिसांचा संशय बळावल्याने, पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी स्वतः दोन पंचांना बोलावून त्या तरुणाची आणि त्याच्या सॅकची झडती घेतली. चौकशीत त्याने आपले नाव नंदादीप नामदेव वाघदरे असल्याचे सांगितले. त्याच्या सॅकची तपासणी केली असता, त्यात पांढऱ्या प्लास्टिक टेपने गुंडाळलेली दोन पॅकेट्स सापडली. या पॅकेट्समध्ये उग्र वासाचा, हिरवट-काळपट रंगाचा एकूण ४ किलो वजनाचा “गांजा” हा अमली पदार्थ आढळून आला.

पोलिसांनी तात्काळ गांजा आणि इतर मुद्देमाल असा एकूण २,४०,१०० रुपयांचा ऐवज जप्त करून आरोपी नंदादीप वाघदरे याला ताब्यात घेतले. त्याच्या विरोधात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३६३/२०२५ नुसार एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५ च्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शहर पोलीस करत आहेत.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, स.पो.उनि. संदीप ओगले आणि त्यांच्या पथकाने केली आहे.