रत्नागिरी: एका बाजूला गणेशोत्सवाचा जल्लोष आणि दुसरीकडे सामाजिक वास्तवाचे भान… याचा अनोखा संगम रत्नागिरीतील एका गणेश देखाव्यातून पाहायला मिळत आहे. शहराजवळील उत्कर्ष नगर येथील रहिवासी संजय वर्तक आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सलग १७ व्या वर्षी पूर्णतः पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारली असून, यावर्षी शासकीय शाळांच्या दुरवस्थेवर अत्यंत मार्मिक देखावा सादर केला आहे. ‘गणपतीच्या चरणी कोटींचे दान करणाऱ्या भाविकांनी शाळांच्या दुरुस्तीसाठी दान करावे,’ असे थेट आवाहन या देखाव्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
काय आहे नेमका देखावा?
वर्तक कुटुंबीयांनी साकारलेल्या या देखाव्यात एक विद्यार्थी आपल्या जीर्ण झालेल्या शाळेसमोर बाप्पाकडे शाळा दुरुस्तीसाठी प्रार्थना करत आहे. त्याच्या भाबड्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन गणपती बाप्पा त्याला आशीर्वाद देण्यासाठी प्रकट होत असल्याचे दृश्य साकारण्यात आले आहे. पुरोगामी महाराष्ट्राचा पाया असलेल्या शिक्षणाची मंदिरे म्हणजेच शाळा, आज जर कोसळण्याच्या स्थितीत असतील तर भविष्यातील विचारवंत कसे घडतील? हा थेट आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न हा देखावा उपस्थित करतो.
परंपरेतून सामाजिक संदेश
संजय जगन्नाथ वर्तक हे गेल्या १७ वर्षांपासून नारळाची सोडणं (काथ्या), सुंभ, कागद, पुठ्ठे अशा टाकाऊ आणि पर्यावरणपूरक वस्तूंपासून अत्यंत कल्पकतेने गणेशाची मूर्ती घडवत आहेत. केवळ मूर्तीच नाही, तर प्रत्येक वर्षी एका नव्या सामाजिक विषयावर देखावा सादर करून जनजागृती करण्याची त्यांची परंपरा आहे. यावर्षी त्यांनी शासकीय शाळांच्या बिकट अवस्थेवर लक्ष केंद्रित केले आहे.
पूर्णतः पर्यावरणपूरक बाप्पा
या देखाव्याची आणि मूर्तीची रचना पूर्णपणे पर्यावरणपूरक वस्तूंमधून करण्यात आली आहे.
- बाप्पाचे शीर: पुठ्ठे, कागद आणि पाटीवरच्या खडूचा कल्पकतेने वापर करून बनवले आहे.
- देखावा: नारळाच्या किशी (भुसा), टाकाऊ पुठ्ठे, शाडूची माती आणि कागदांचा वापर केला आहे.
- आसन: गणपतीच्या पूजेच्या मूर्तीचे आसन जुन्या कागदांपासून पुस्तकाच्या प्रतिकृतीत साकारले आहे.
या देखाव्याच्या माध्यमातून वर्तक कुटुंबीयांनी केवळ शाळांची दुरवस्थाच मांडली नाही, तर गणेशोत्सवातील अमाप देणग्या योग्य ठिकाणी कशा वापरल्या जाव्यात, याचा एक आदर्श पर्याय समाजासमोर ठेवला आहे.
देखावा पाहण्यासाठी आणि या अनोख्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी संपर्क:
- नाव: संजय जगन्नाथ वर्तक
- फोन नंबर: 9421231963 / 7387808883 / 8446274460
- पत्ता: १५८, दुर्वांकर, उत्कर्ष नगर, वैभव सोसायटी, कुवारबांव, रत्नागिरी.














