Highway Traffic Jam : महामार्ग वाहतूक कोंडीत!

चिपळूण : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणवासी मोठ्या संख्येने गावोगावी दाखल होत आहेत. त्यामुळे चिपळुणातील वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी हाऊस फुल्ल झाला होता तर दुसर्‍या बाजूला चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकात देखील बाहेरगावाहून आलेल्या बसमुळे वाहतूक कोंडी झाली होती. याशिवाय बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यात पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने गणेशभक्तांची गैरसोय झाली.

गणेशोत्सवासाठी दरवर्षी कोकणवासी मोठ्या संख्येने सहकुटुंब गावी येत असतात. येथील चिपळूण आगारात अडीचशेहून अधिक गाड्या दाखल झाल्या आहेत. सर्वात जास्त प्रवासी 26 रोजी दाखल झाले आहेत. तसेच यावर्षी भाजप, शिंदे शिवसेना यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मोफत एस्टी गाड्यांची सेवा असल्याने महामार्ग वाहतुकीने व्यापून गेला आहे. मोठ्या प्रमाणात महामार्गावर एसटीची वाहतूक सुरू आहे. याशिवाय खासगी ट्रॅव्हल्स, कार व अन्य गाड्यांची रेलचेल आहे. इतकेच काय अनेक हौशी गणेशभक्त स्वत:ची मोटारसायकल, तर काही सीएनजी रिक्षा घेऊन गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झाले आहेत. त्यामुळे मुंबई-गोवा तसेच गुहागर-विजापूर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

परशुराम घाटात काही भागात एकेरी वाहतूक सुरू असल्याने घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. विशेषकरून सकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्याचप्रमाणे बहादूरशेख चौकाच्या अलीकडे कळंबस्तेपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परतणार्‍या वाहनांची देखील मोठ्या प्रमाणात रीघ लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दोन्ही बाजूने वर्दळ होती. काही प्रवासी सोमवारी रात्री 7 वा. प्रवासाला निघाले. ते दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी 10 वा. गावी पोहोचले. त्यामुळे त्यांचा प्रवास 12 ते 15 तासांचा झाला.

महामार्गावर पडलेले खड्डे, खड्डेमय सर्व्हिस रोड, डायव्हर्शन यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवली. संपूर्ण राज्यभरातून एस.टी. आगाराच्या ज्यादा गाड्या कोकणात दाखल झाल्या आहेत. अनेक गाड्या ठिकठिकाणी मुंबईच्या वाटेवर, परतीच्या वाटेवर थांबलेल्या दिसून आल्या. महामार्गावर सर्व्हिस रोड व काही ठिकाणी परतीच्या लेनवर बसेस उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकात देखील गाड्या लावण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत व्हावी म्हणून ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे. या शिवाय महामार्गावर पोलिसांसह परिवहन अधिकारी देखील महामार्गावर गस्त घालत आहेत.

Amey jwelrs

सीएनजीसाठी रांगा…
मुंबई, पुणे येथील कोकणवासी गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात गावी दाखल झाले आहेत. यामुळे चिपळुणातील सीएनजी पंप गर्दीने फुलून गेले. सीएनजी भरण्यासाठी येथे लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. शहरातील शिवाजीनगर, वालोपे, रावतळे तसेच कामथे येथील सीएनजी पंपावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. सीएनजीसाठी काहींना तासन्तास रांगेत राहावे लागले. त्यात शिवाजीनगर येथील पंपावर एसटी बससाठी सीएनजी उपलब्ध असल्याने त्या ठिकाणीही बसेसची रांग होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 28-08-2025