Ganpati visarjan : खेडमध्ये दीड दिवसाच्या ९५८ गणरायांना निरोप

खेड : ‘गणपती बाप्पा मोरया या पुढच्या वर्षी लवकर या…’ जयघोषांसह खेड तालुक्यात ठिकठिकाणी आज दीड दिवसांच्या ९५८ घरगुती व खेड बसस्थानकात विराजमान सार्वजनिक गणपतींचे विसर्जन झाले. अनेकांच्या घरी परंपरेनुसार दीड दिवसांत गणपतींचे विसर्जन करण्यात आले.

तालुक्यात दुपारी तीननंतर गणेशभक्तांनी सहकुटुंब विसर्जन सहभागी होऊन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. गणरायांची चतुर्थीच्या मुहूर्तावर स्थापना केली होती. दुपारी तीननंतर अनेकांनी विसर्जनाची तयारी केली. त्यानंतर विधिवत पूजा, आरती करून व नैवेद्य दाखवून जगबुडी नदीच्या घाटावर विसर्जन केले गेले. यामध्ये एसटी बसस्थानकात कर्मचाऱ्यांनी प्रतिष्ठापना केलेल्या सार्वजनिक गणपतीचे तर शहरातील ९५८ घरगुती गणपतींना निरोप देण्यात आला. विसर्जनाच्या दरम्यान पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गणेशमूर्तीना सांभाळताना भक्तांना थोडीशी कसरत करावी लागली.

साफसफाईमुळे विसर्जन सुरळीत
नगरपालिकेने जगबुडी नदीकिनारी आठ दिवसांपूर्वीच साफसफाई केली होती. या ठिकाणी स्वयंसेवकांच्या मदतीने गणपतींचे विसर्जन करण्यात आले. पोलिसांनी विसर्जन मार्गावर वाहतूक सुरळीत राहण्यासाठी नियोजन केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
*शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:51 AM 29-Aug-2025